Panghrun Marathi Movie (Photo Credit - YouTube)

'काकस्पर्श' (Kaksparsh) आणि 'नटसम्राट' (Natasamrat) यांसारख्या दर्जेदार कलाकृतींनंतर दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) व झी स्टुडिओजचा बहुचर्चित 'पांघरुण' (Panghrun) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झालाय. यापूर्वी या चित्रपटाच्या टीझरलाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. चित्रपटातील गाण्यांचेही संगीतप्रेमींकडून भरभरून कौतुक होत असतानाच आता 'पांघरूण'चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. ट्रेलरमध्ये सुरुवातीलाच स्वातंत्र्य पूर्वीचा काळ, निसर्गयरम्य कोकणचे दर्शन घडते. लहान वयातच विधवा झालेल्या नायिकेचे वडिलांच्या वयाच्या माणसाशी लग्न होते. वयाने मोठ्या असणाऱ्या आपल्या सहजीवनातील साथीदाराबद्दलची ओढ आणि त्यातून होणारी तिची घालमेल यात पाहायला मिळतेय. तिच्या आयुष्याचा संसारिक प्रवास कसा होतो हे हळूहळू उलगडत जाणारी 'एक विलक्षण प्रेम कहाणी' आपल्याला 'पांघरूण' मध्ये अनुभवायला मिळणार आहे.

महेश मांजरेकर व झी स्टुडिओज 'पांघरूण' च्या निमित्ताने पुन्हा एकदा अनोखा कलाविष्कार रसिक प्रेक्षकांसमोर सादर करण्यास सज्ज झाले आहेत. महेश मांजरेकर दिग्दर्शित या चित्रपटाला हितेश मोडक, डॉ. सलील कुलकर्णी, पवनदीप राजन आणि अजित परब यांचे संगीत लाभले आहे तर वैभव जोशी यांनी या गाण्यांना शब्दबद्ध केले आहे. अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हजेरी लावणाऱ्या या चित्रपटात गौरी इंगवले, अमोल बावडेकर, रोहित फाळके, विद्याधर जोशी, सुरेख तळवलकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. (हे ही वाचा Zombivli Trailer: पहिला मराठी Zombie Movie 'झोंबिवली' चा ट्रेलर रीलिज; Lalit Prabhakar, Amey Wagh चा पहा हटके अंदाज)

दिग्दर्शक महेश मांजरेकर 'पांघरूण'बद्दल म्हणतात  "बराच काळ आम्ही चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत होतो. अखेर 4 फेब्रुवारीला रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना  'पांघरूण' पाहता येणार असल्याने मी सुद्धा खूपच उत्सुक आहे. चित्रपटातील गाण्यांचे रसिक प्रेक्षकांकडून जे कौतुक होत आहे, याचा खूप आनंद आहे. प्रत्येक कलाकाराने आपापल्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. 'पांघरूण'चे संगीत सुद्धा उत्तम झाले आहे. आता हळूहळू अनेक मराठी सिनेमे प्रदर्शित होऊ लागले  आहेत आणि मराठी प्रेक्षक चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहत आहेत, त्यांच्या या प्रेमामुळेच आम्हाला प्रोत्साहन मिळते. प्रेक्षकांनी आजवर ज्याप्रमाणे माझ्या इतर चित्रपटांवर प्रेम केले तसेच प्रेम 'पांघरूण'वरही करतील, याची खात्री आहे."