सोनू सुदच्या नावे स्थलांतरित मजुरांच्या सोयीसाठी पैसे उकळत असल्याचा प्रकार उघड; स्क्रीनशॉर्ट्स शेअर करतअभिनेत्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे केल आवाहन

तसेच स्थलांतरित मजुरांना घरी पाठवण्यासाठी आपण कोणतेही शुल्क घेत नसल्याचेही त्याने स्पष्ट केले आहे.

Sonu Sood | (Photo Credits: Facebook)

अभिनेता सोनू सुद हा कोरोना संकट काळात अनेक मजुरांच्या मदतीला धाऊन गेला. अनेकांची उत्तर प्रदेश, बिहार मध्ये घरपोच मोफत पोहचवण्याची सोयदेखील त्याने केली. मात्र आता या संकटामध्ये काहींनी परिस्थितीचा गैरफायदा घेत सोनु सुदच्या नावाने पैसे उकळत असल्याचे काही प्रकारदेखील समोर आले आहेत. आज अभिनेता सोनू सुदने ट्वीटर अकाऊंटच्या माध्यमातून काही स्क्रीन शॉर्ट्स शेअर करत नागरिकांना अशा प्रकारापासून दूर राहण्याचं आवाहन केलं आहे. तसेच स्थलांतरित मजुरांना घरी पाठवण्यासाठी आपण कोणतेही शुल्क घेत नसल्याचेही त्याने स्पष्ट केले आहे. असा कोणताही प्रकार समोर आल्यास तात्काळ त्याच्याशी किंवा स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधा असे देखील सांगण्यात आले आहे. रोहित पवार यांनी घेतली बॉलिवूड अभिनेता सोनू सूद यांची सदिच्छा भेट.

महाराष्ट्रात अनेक मजुरांचा कोरोना व्हायरस लॉकडाऊन दरम्यान कामधंदा गेला आहे. यामुळे तळहातावर पोट असणार्‍यांनी घरी परत जाण्याचा मार्ग निवडला. मात्र सुरूवातीला श्रमिक स्पेशल ट्रेनच्या यादीत नंबर न लागलेले किंवा इच्छित स्थळी जाण्यासाठी ट्रेन नसल्याने अनेकांची होणारी गैरसोय पाहून सोनू सुद समोर आला होता. त्याने शेकडो लोकांची मूळगावी परतण्याची सोयदेखील केली. त्याच्या या प्रयत्नांचं अनेक स्तरातून कौतुक होत आहे. मात्र काहीजण मजुरांची मजबुरी पाहून त्यांची फसवणूक करत असल्याचा प्रकारदेखील आता समोर आला आहे.

सोनू सूदचं ट्वीट

काही दिवसांपूर्वीच सोनू सुदच्या या संकटसमयी धावून येण्याच्या कार्याचा महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून कौतुकदेखील करण्यात आलं आहे.कालच आमदार रोहित पवार यांनीदेखील सोनू सुदची त्याच्या घरी भेट घेतली.

भारतामध्ये 24 मार्चपासून कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आहे. 30 जूनपर्यंत त्याचा 5वा टप्पा आहे. मात्र आता काही प्रमाणात नागरिकांना प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.