Har Har Mahadev: पाच भारतीय भाषांमध्ये घुमणार शिवगर्जना 'हर हर महादेव'
झी स्टुडिओजने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 'हर हर महादेव' हा चित्रपट मराठीसह हिंदी, तामिळ, तेलगू आणि कन्नड या भाषांमध्ये एकाच दिवशी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरात आणि जगात कुठेही असणाऱ्या मराठी माणसाला सतत प्रेरणा देणारं, ऊर्जा देणारं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि या अखंड उर्जेला सतत प्रवाही ठेवणारी गोष्ट म्हणजे 'हर हर महादेव' (Har Har Mahadev) ही शिवगर्जना ! शिवाजी महाराजांचं कार्य त्यांची थोरवी याचं आकर्षण, कुतूहल आजही अनेकांच्या चर्चेचा, अभ्यासाचा विषय असतो. केवळ महाराष्ट्रातच नाही तर इतर भारतीय भाषिकही महाराजांच्या कार्यावर संशोधन करतात. महाराजांचा हाच महिमा भव्य दिव्य स्वरूपात सर्वांसमोर येणार आहे 'हर हर महादेव' या चित्रपटातून. आणि हा महिमा सर्वदूर पोहचावा यासाठीच या चित्रपटाची निर्मिती संस्था असलेल्या झी स्टुडिओजने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 'हर हर महादेव' हा चित्रपट मराठीसह हिंदी, तामिळ, तेलगू आणि कन्नड या भाषांमध्ये एकाच दिवशी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
मराठी चित्रपटांच्या इतिहासात आजवर कधीही न घडलेली अशी ही घटना हर हर महादेवच्या निमित्ताने घडणार आहे. अभिजित देशपांडे यांच्या लेखन आणि दिग्दर्शनाने सजलेला हा चित्रपट दिवाळीमध्ये सर्वांच्या भेटीस येणार आहे. दक्षिणेकडील सिनेमाचं दैदीप्यमान यश, हिंदी भाषेत डब (भाषांतरीत) होऊन सर्वदूर पोहोचलेला दक्षिण सिनेमा आज सर्वांवर गारुड करण्यात यशस्वी झालाय. आपला मराठी सिनेमा असा भव्य दिव्य कधी बनणार ? तो इतर भाषांमध्ये कधी प्रदर्शित होणार ? याबद्दलच्या चर्चा आपण नेहमी करतो किंवा ऐकतो. या प्रश्नांना आणि चर्चांना आता एक सकारात्मक उत्तर मिळणार आहे 'हर हर महादेव' चित्रपटाच्या माध्यमातून. (हे देखील वाचा: 'झोलझाल' चित्रपटाचा म्युझिक लॉंच सोहळा आणि टिझर अनावरण सोहळा संपन्न)
View this post on Instagram
या चित्रपटाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे याची व्हिएफएक्स टीम. अनेक हॉलिवूडपटांवर काम करणारे व्हिएफएक्स तंत्रज्ञ यावर काम करत असून तब्बल 400 हुन अधिक तंत्रज्ञांचा यात समावेश आहे." सुनील फडतरे यांच्या श्री गणेश मार्केटिंग आणि झी स्टुडिओजची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिजित देशपांडे यांचं आहे. येत्या दिवाळीत हा चित्रपट सर्व प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jun 06, 2022 03:37 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

