संजय दत्तचे मराठीमध्ये पदार्पण, सुनील दत्त यांना समर्पित 'बाबा' चित्रपट 2 ऑगस्टला होणार प्रदर्शित (Photo)
आता संजय दत्त चक्क मराठीमध्ये ‘बाबा’ (Baba) या चित्रपटाद्वारे पदार्पण करत आहे. संजय दत्त प्रोडक्शनचा हा पहिला मराठी चित्रपट 2 ऑगस्टला प्रदर्शित होत आहे.
1971 साली बालकलाकार म्हणून आपल्या करियरला सुरुवात करणारा संजय दत्त (Sanjay Dutt), 1981 साली प्रदर्शित झालेल्या रॉकी चित्रपटामुळे रातोरात स्टार बनला. त्यानंतर आजपर्यंत गेल्या 38 वर्षांत संजय दत्तने अनेक हिट चित्रपट दिले. आता संजय दत्त चक्क मराठीमध्ये ‘बाबा’ (Baba) या चित्रपटाद्वारे पदार्पण करत आहे. संजय दत्त प्रोडक्शनचा हा पहिला मराठी चित्रपट 2 ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. संजय दत्त या चित्रपटामध्ये एका अभिनेत्याच्या नाही तर निर्मात्याच्या भूमिकेत असणार आहे.
ट्विटरवर संजयने याबाबत एक पोस्ट करून ही माहिती दिली आहे. ही पोस्ट करताना संजयने हा चित्रपट आपल्या वडिलांना समर्पित असे लिहिले आहे. संजयच्या आयुष्यात त्याचे वडील सुनील दत्त यांचे फार मोठे स्थान होते. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्यांनी संजयला सर्वोतोपरी मदत केली होती. त्यामुळे आपला पहिला चित्रपट संजयने त्यांच्या आठवणीत बनवला आहे. संजयची पत्नी मान्यता दत्तने ही याबाबत पोस्ट केली आहे. या पोस्टद्वारे चित्रपटाचे मोशन पिक्चर प्रदर्शित करण्यात आले आहे. या फोटोमध्ये एक लहान मुलगा त्याच्या वडिलांसोबत सायकलवर बसलेला दिसून येत आहे. (हेही वाचा: एव्हरग्रीन अभिनेत्री 'जीनत अमान' रुपेरी पडद्यावर करणार कमबॅक)
राज गुप्त यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटामध्ये नक्की कोण कलाकार असतील याबाबत कोणतीही माहिती अजून मिळालेली नाही. संजय दत्तच्या आधी अक्षय कुमार, प्रियांका चोप्रा या बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकारांनी देखील मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे.