ज्येष्ठ संगीतकार रामलक्ष्मण यांना यंदाचा 'गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार' जाहीर
संगीत क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल हा पुरस्कार दिला जातो.
आपल्या मंत्रमुग्ध आवाजामुळे आजही संगीतप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या लता मंगेशकर यांचा आज 90 वा जन्मदिन आहे. या जन्मदिनाबद्दल महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या मानाच्या ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कारा’ची घोषणा झाली आहे. संगीत क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल हा पुरस्कार दिला जातो. यंदा ज्येष्ठ संगीतकार विजय पाटील उर्फ रामलक्ष्मण हे या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. 5 लाख रुपये, मानपत्र, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असून, हा पुरस्कार लता मंगेशकर यांच्या वाढदिवसादिवशी प्रदान करण्यात येतो.
रामलक्ष्मण यांनी हिंदी आणि मराठीमधील तब्बल 92 चित्रपटांना संगीत दिले आहे. मैने प्यार किया, हम आपके है कौन, हम साथ साथ है हे रामलक्ष्मण यांचे लोकप्रिय असलेले काही चित्रपट.
लता मंगेशकर यांचा वाढदिवस हा त्यांच्या चाहत्यांसाठी फार मोठा दिवस असतो. याच दिवसाचे औचित्य साधून, दीदींची बहिण मीना खाडिलकर यांनी लिहिलेल्या 'मोठी तिची सावली' या पुस्तकाचे प्रकाशनही मुंबई येथील रविंद्र नाट्य मंदिरात होणार आहे.
याआधी या पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या मान्यवरांमध्ये यापूर्वी हा पुरस्कार पुष्पा पागधरे, माणिक वर्मा, श्रीनिवास खळे, गजानन वाटवे, दत्ता डावजेकर, पंडित जितेंद्र अभिषेकी, पंडित हदयनाथ मंगेशकर, ज्योत्स्ना भोळे, आशा भोसले, अनिल विश्वास, सुधीर फडके, प्यारेलाल शर्मा, रवींद्र जैन, स्नेहल भाटकर, मन्ना डे, जयमाला शिलेदार, खय्याम, महेंद्र कपूर, सुमन कल्याणपूर, सुलोचना चव्हाण, यशवंत देव, आनंद शहा, अशोक पत्की, कृष्णा कल्ले, प्रभाकर जोग, उत्तम ब्रिदपाल सिंग इत्यादी लोकांचा समावेश होतो.