बलात्कार: अभिनेत्री, मॉडेल पद्म लक्ष्मीकडून तब्बल ३२ वर्षांनी ''त्या' प्रसंगाची वाच्यता; बाळगलेल्या मौनाचाही खुलासा
पद्म लक्ष्मी, ही एक प्रसिद्ध अभिनेत्री, मॉडेल, अमेरिकन टीव्ही पर्सनालिटी आणि एक लेखिकासुद्धा. वयाच्या सोळाव्या वर्षी तिच्यावर बलात्कार झाला. आपल्यासोबत घडलेल्या दुष्कर्माची वाच्यता तिने नुकतीच केली. तब्बल ३२ वर्षांनी. आपल्यावर झालेल्या अन्याबाबत इतकी वर्षे मौन का बाळगले? याचा खुलासाही तिने स्वत:च केला आहे. हा खुलासा म्हणजे बलात्कारासारख्या भयावह घटनेचा पीडित व्यक्तिवर किती खोल परिणाम होतो याचे महत्त्वाचे उदाहरण. आपल्या मौनाबाबत तिने जे लिहिले आहे ते, कोणत्याही सहृदय व्यक्तिला अंतर्मुख करणारे असेच आहे.
'द न्यू यॉर्क' टाईम्समध्ये पद्म लक्ष्मीने एक अनावृत्त पत्र लिहिले आहे. या पत्रात पद्म लक्ष्मी म्हणते, 'तेव्हा तिने २३ वर्षाच्या एका उत्साही आणि हॅण्डसम व्यक्तिसोबत डेटींग सुरु केले होते. हे प्रकरण सुरु असतानाच 'तो' प्रसंग घडला. नवीन वर्षाची सुरुवात होती. नव्या वर्षांच्या एका रम्य संध्याकाळी ते दोघे भेटले होते. त्याच संध्याकाळी त्याने तिच्यावर बलात्कार केला'. ती लिहिते, 'तेव्हा ती अवघ्या ७ वर्षांची होती. तिच्या सावत्र वडिलांच्या एका नातेवाईकाने तिच्या पायंच्या मध्यभागी वाईट अर्थाने (पद्धतीने) स्पर्श केला. तिचा हातही त्याच्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला. आपल्यासोबत घडलेल्या प्रकाराबाबत तिने आई आणि सावत्र वडिलांना माहिती दिली तेव्हा, त्यांनी तिला भारतात पाठवले'. भारतात तिचे आजी-आजोबा राहात असत. या घटनेचा तिच्यावर खोल परिणाम झाला, असे ती म्हणते. तुमच्यावर झालेल्या अन्याबद्दल तुम्ही वाच्यता कराल तर, तुम्हाला बाहेर फेकले जाते, असे या प्रकारातून माझ्या मनावर बिंबल्याचे लक्ष्मी लिहिते.
माझ्यासोबत घडलेल्या प्रकाराचा माझ्यावर अत्यंत वाईट परिणाम झाला. इतका की, माझा इंटीमेट पार्टनर आणि थेरपिस्ट यांच्यासोबत या प्रकाराबाबत बोलायलाही मला इतकी वर्षे लागली. अमेरिकेतील सुप्रिम कोर्टाच्या न्यायमूर्ती पदाचे प्रमुख उमेदवार ब्रेट केवेनॉ यांच्यावर दोन महिलांनी लैंगिक शोषणाचा आरोप नुकताच केला आहे. या आरोपानंतर 'टॉप शेफ'ची होस्ट लक्ष्मीने आपल्यासोबत घडलेल्या प्रकाराबद्दल वाच्यता केली आहे. ब्रेट केवेनॉ यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलांवरही आरोप होत आहे की, त्या इतकी वर्षे गप्प का होत्या. केवेनॉ यांचे प्रकरण सध्या इतके गाजते आहे की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही या दोन महिलांनी काही वर्षांपूर्वीच पोलिसांमध्ये तक्रार करायला पाहिजे होती असे ट्विट केले होते.
दरम्यान, पद्म लक्ष्मी २००३मध्ये 'बूम'मध्ये कतरीना कैफसोबत दिसली होती. पद्म लक्ष्मी ही आंतरराष्ट्रीय किर्तीचे लेखक सलमान रश्दी यांची पत्नीही होती.