Bharath Majha Desh Aahe Trailer: जवानांच्या कुटुंबियांवर भाष्य करणाऱ्या 'भारत माझा देश आहे'चा ट्रेलर प्रदर्शित

नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आला. एबीसी क्रिएशन प्रस्तुत, डॉ. आशिष अग्रवाल निर्मित हा चित्रपट ६ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत... ही प्रतिज्ञा अगदी बालपणापासूनच आपल्या मनावर कोरली गेली आहे. अनेकांच्या भावना या प्रतिज्ञेशी जोडल्या गेल्या आहेत. या भावनेशी जोडलेली अशीच एक संवेदनशील कथा आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न दिग्दर्शक पांडुरंग कृष्णा जाधव (Pandurang Jadhav) यांनी 'भारत माझा देश आहे' या चित्रपटातून केला आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आला. एबीसी क्रिएशन प्रस्तुत, डॉ. आशिष अग्रवाल निर्मित हा चित्रपट ६ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. ज्या वेळी सीमेवर सैनिक लढत असतात, जेव्हा टीव्हीवर युद्धाची ब्रेकिंग न्यूज येते तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांच्या मनाची घालमेल, आपला माणूस तिथे सुखरूप आहे का, ही सतत सतवणारी चिंता, एकंदरच सैनिकांच्या कुटुंबियांवर प्रकाशझोत टाकणारा हा चित्रपट आहे. विषय जरी अतिशय संवेदनशील असला तरी खूप हलक्याफुलक्या पद्धतीने तो चित्रपटात मांडण्यात आला आहे.

ट्रेलरमध्ये आपला मुलगा परत यावा याकरता सोनूचा खास मित्र असलेल्या नाऱ्याचा बळी देण्याचा नवस सोनूची आजी बोलते. आता नाऱ्याचा बळी जाणार का आणि सोनूचे बाबा परत येणार का, हे चित्रपट पाहिल्यावरच प्रेक्षकांना कळणार आहे. या चित्रपटातील गाणी समिर सामंत यांची असून या गाण्यांना अश्विन श्रीनिवासन यांचे संगीत लाभले आहे. तर महालक्ष्मी अय्यर, अश्विन श्रीनिवासन, अंकिता जोशी, संकेत नाईक, अथर्व श्रीनिवासन, विश्व झा जाधव, तनिष्का माने यांनी या गाण्यांना स्वरबद्ध केले आहे. या चित्रपटाची कथा पांडुरंग कृष्णा जाधव यांचीच असून पटकथा आणि संवाद निशांत नाथराम धापसे यांचे आहेत.

'भारत माझा देश आहे'चे ट्रेलर पाहून बॉलिवूडच्या काही कलाकारांनी, दिग्दर्शकांनी, निर्मात्यांनी त्याची स्तुती केली आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील 'भारत माता की जय' हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले. राजवीरसिंहराजे गायकवाड आणि देवांशी सावंत यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या या गाण्यात सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांची कथा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या चित्रपटात या दोन बालकलाकारांसोबत शशांक शेंडे, मंगेश देसाई, छाया कदम, हेमांगी कवी, नम्रता साळोखे यांच्यासह अन्य कलाकार आहेत.

यावेळी बॅालिवूड अभिनेता मनोज वाजपेयी म्हणाले, ‘’ ज्यावेळी मनात एखादी भावना असेल तेव्हाच असे विषय हाताळले जातात. अशा प्रकारचा विषय हाताळणे सोपी गोष्ट नाही. कारण हा खूप नाजूक विषय असून अनेकांच्या भावना याच्याशी जोडलेल्या आहेत. ज्यावेळी सैनिक सीमेवर लढत असतात, त्याचवेळी त्यांच्या कुटुंबाचीही घरी एकप्रकारची लढाईच सुरु असते. पांडुरंग जाधव यांचा चित्रपटासाठी हा विषय निवडणे, हा नक्कीच कौतुकास्पद प्रयत्न आहे. ट्रेलर पाहून कळतेय की हा खूपच उत्सुकता वाढवणारा चित्रपट आहे. सगळ्याच कलाकारांनी विशेषतः बालकलाकारांनी खूप सुंदर अभिनय केल्याचे दिसत आहे.’’ (हे देखील वाचा: Samarenu Trailer: प्रेमाची व्याख्या बदलणाऱ्या ‘समरेणू’ चा ट्रेलर प्रदर्शित)

चित्रपटाचे दिग्दर्शक पांडुरंग कृष्णा जाधव म्हणतात, ''हा एक देशभक्तीपर चित्रपट असला तरीही प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा हा चित्रपट आहे. यातून सामाजिक संदेशही देण्यात आला आहे. हा चित्रपट कोल्हापूरातील एका अशा गावात चित्रित करण्यात आला आहे जिथे प्रत्येक घरातील एक तरी व्यक्ती सैनिकात आहे. शिवाजी जन्मावा तो शेजाऱ्याच्या घरी, अशी मानसिकता बाळगणाऱ्या या युगात आज सैनिकटाकळी या गावात प्रत्येक घराघरात शिवाजी महाराजांचा जन्म झाला आहे. या गावातील प्रत्येक जवानांच्या कुटुंबीयांचा मी सन्मान करतो. ज्यांना वस्तुस्थिती माहित असूनही त्यांनी ही जोखीम स्वीकारली आहे. आज 'भारत माझा देश आहे' हा आमचा चित्रपट मी या सर्वांना समर्पित करत आहे. हा चित्रपट सर्वच वयोगटासाठी असला तरी लहान मुलांना हा चित्रपट विशेष आवडेल. बऱ्याच काळाने लहान मुलांसाठी चित्रपट बनला आहे. त्यात शाळांना सुट्ट्या आहेत. त्यामुळे प्रत्येक पालकाने आपल्या पाल्यासोबत हा चित्रपट पाहावा. ''

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now