Raju Sapte Suicide Case: कला दिग्दर्शक राजू साप्ते आत्महत्या प्रकरणी मुख्य आरोपी राकेश मौर्य याला अटक

मराठी सिनेसृष्टीतील कला दिग्दर्शक राजू साप्ते आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी राकेश मौर्य याला अटक करण्यात आली आहे.

Arrest | Representational Image (Photo Credits: Pixabay)

मराठी सिनेसृष्टीतील कला दिग्दर्शक राजू साप्ते आत्महत्या प्रकरणातील (Raju Sapte Suicide Case) मुख्य आरोपी राकेश मौर्य (Rakesh Maurya) याला अटक करण्यात आली आहे. अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी मौर्य पिंपरी येथील कीज हॉटेलमध्ये वकीलांना भेटण्यासाठी आला होता. त्याचवेळी पोलिसांनी त्याच्यावर अटकेची कारवाई केली. (Raju Sapte Suicide Case: राजू साप्ते आत्महत्या प्रकरणी अजून एकाला अटक; अजूनही 4 जणांचा शोध सुरू)

राजू साप्ते यांनी 3 जुलै रोजी राहत्या घरी आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये त्यांनी राकेश मौर्य यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आत्महत्येनंतर हा व्हिडिओ समोर आला. मात्र तेव्हापासून राकेश मौर्य फरार होता. पोलिस त्याच्या मागावर होते. आज अखेर त्याला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं आहे. याप्रकरणात मुंबई आणि पुणे पोलिसांकडून चौघांचा शोध सुरू आहे. एकूण 5 पथकांकडून शोध सुरू आहे. यापूर्वी 2 आरोपींना अटक करण्यात आलं होतं.

राजू साप्ते हे कलादिग्दर्शक असून मागील 22 वर्षांपासून मनोरंजन विश्वात ते काम करत होते. मात्र लेबर युनियनचा दबाव आणि सातत्याने होत असलेल्या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली. मात्र त्यापूर्वी त्यांनी एक व्हिडिओ रेकॉर्ड करत आपली व्यथा मांडली. यात त्यांनी राकेश मौर्य यांचे नाव प्रामुख्याने घेतले होते. सर्वांचे पैसे वेळेवर देऊनही राकेश मौर्य वारंवार पैशावरुन त्रास देत असून कामगारांना माझ्याविरुद्ध भडकवण्याचे काम करत असल्याचे त्यांनी व्हिडिओत म्हटले होते, तसंच मौर्य यांच्यामुळे काही प्रोजेक्ट्स सोडायला लागल्याचे त्यांनी सांगितले होते.

दरम्यान, राजू साप्ते यांच्या आत्महत्येनंतर मनसेने आक्रमक पवित्रा घेतला होता. यापुढे जरी कोणी मराठी मनोरंजन क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञ, निर्माते यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्यांचे हातपाय तोडून गळ्यात बांधू, असा इशारा मनसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिला होता.