Nitish Bhardwaj Divorce: महाभारत फेम नितीश भारद्वाज यांनी लग्नाच्या 12 वर्षानंतर घेतला घटस्फोट; म्हणाले- 'वेगळे होणे हे मृत्यूपेक्षा जास्त वेदनादायक'
लोक त्यांना अजूनही त्यांच्या कृष्णाच्या भूमिकेवरून ओळखतात. नितीश यांनी बॉलिवूडशिवाय मराठी, तमिळ आणि मल्याळम चित्रपटांमध्येही काम केले आहे
महाभारतातील कृष्णाची भूमिका साकारणारे नितीश भारद्वाज (Nitish Bharadwaj) त्यांच्या लग्नाच्या 12 वर्षांनंतर पत्नी, आयएएस (IAS) स्मिता गाते यांच्यापासून वेगळे झाले आहेत. दोघांनी सप्टेंबर 2019 मध्ये वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. सध्या हे प्रकरण न्यायालयात आहे. अलीकडेच एका मुलाखतीमध्ये नितीश यांनी त्यांच्या पत्नीपासून विभक्त होण्याची पुष्टी केली. यावेळी त्यांनी घटस्फोट खूप वेदनादायक असल्याचे सांगितले. या मुलाखतीमध्ये नितीश यांनी आपल्या घटस्फोटाबाबत भाष्य करत दुःख व्यक्त केले आहे. या जोडप्याला दोन जुळ्या मुली असून सध्या त्या आपल्या आईसोबत इंदूरमध्ये राहतात.
स्मिता गाते यांच्याशी झालेल्या घटस्फोटाबद्दल बॉम्बे टाइम्सशी बोलताना नितीश म्हणतात- 'होय हे खरे आहे, मी सप्टेंबर 2019 मध्ये मुंबईतील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला होता. आम्ही का वेगळे झालो, त्यामागे काय कारण आहे, याबाबत मी भाष्य करणार नाही. हे प्रकरण अजूनही न्यायालयात आहे. मी एवढेच म्हणू शकतो की कधीकधी घटस्फोट मृत्यूपेक्षा जास्त वेदनादायक असतो, कारण तुम्हाला कोलमडून पडलेल्या हृदयासोबत जगावे लागते.’
नितीश आणि स्मिता या दोघांचे हे दुसरे लग्न आहे. लग्नाच्या संकल्पनेवर आपले मत व्यक्त करताना नितीश पुढे म्हणतात- 'माझा या संकल्पनेवर पूर्ण विश्वास आहे. पण, या बाबतीत मी कमनशिबी ठरलो. साधारणपणे, लग्न तुटण्याची अनेक कारणे असू शकतात. कधी तडजोड न करणाऱ्या वृत्तीमुळे तर कधी भावनांच्या अभावामुळे असे होऊ शकते. कधीकधी अहंकार आणि फक्त स्वतःबद्दल विचार करणे देखील घटस्फोटाचे कारण असू शकते.’
ते पुढे म्हणतात, ‘पण जेव्हा कुटुंब तुटते तेव्हा त्याचा सगळ्यात जास्त त्रास मुलांना होतो. त्यामुळे आपल्या निर्णयामुळे मुलांचे कमीत कमी नुकसान होईल याची काळजी घेणे ही पालकांची जबाबदारी आहे.’ (हेही वाचा: धनुषने पत्नी ऐश्वर्यापासून वेगळे होण्याचा घेतला निर्णय, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन दिली माहिती)
दरम्यान, नितीश भारद्वाज यांनी बीआर चोप्रा यांच्या महाभारतमधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. लोक त्यांना अजूनही त्यांच्या कृष्णाच्या भूमिकेवरून ओळखतात. नितीश यांनी बॉलिवूडशिवाय मराठी, तमिळ आणि मल्याळम चित्रपटांमध्येही काम केले आहे. ते 1996 च्या लोकसभा निवडणुकीत जमशेदपूरमधून भाजपच्या तिकीटावर लोकसभेत पोहोचले होते. 1991 मध्ये त्यांचे पहिले लग्न मोनिषा पाटीलसोबत झाले होते, मात्र 2005 मध्ये दोघेही वेगळे झाले. 2009 मध्ये नितीश यांनी आयएएस अधिकारी स्मिता गाते यांच्याशी लग्न केले.