या पुस्तकांवर आधारीत आहेत हे लोकप्रिय मराठी सिनेमे
मराठी चित्रपटसृष्टी ही भारतातील एक सर्वात जुनी चित्रपटसृष्टी समजली जाते. कृष्णधवल चित्रपटांच्या काळापासून ते अगदी ‘सैराट’एरा पर्यंत मराठीमध्ये अगणित विषय हाताळले गेले आहेत. यामध्ये सामाजिक बदलांचा, राजकारणाचा, बदलत्या जीवनशैलीचा प्रभाव देखील चित्रपटांवर दिसून येतो. अशा आजूबाजूला घडणाऱ्या घटनांसोबत काही सुप्रसिद्ध कलाकृतींच्या विषयांबाबतही मराठीमध्ये अनेक प्रयोग झालेले दिसतात. चला तर पाहूया अशा कोणत्या साहित्यकृती अथवा जुन्या कलाकृती आहेत ज्यावर बनले आहेत हे लोकप्रिय मराठीचित्रपट
१) श्यामची आई – आईबद्दल असणाऱ्या प्रेम, भक्ति व कृतज्ञता अशा अपार भावना 'श्यामची आई' या पुस्तकात साने गुरुजींनी व्यक्त केल्या आहेत. याच पुस्तकावर दिग्दर्शक प्र.के.अत्रे यांनी १९५३ साली चित्रपट बनवला होता. माधव वझे, वनमाला व दामूअण्णा जोशी या अभिनेत्यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने, १९५४ साली मानाचा भारतीय केंद्रशासनातर्फे दिला जाणारा पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही पटकावला होता.
२) पिंजरा – व्ही. शांताराम यांचा पिंजरा आजही संध्या, डॉ. लागू यांचा अभिनय आणि राम कदम, जगदीश खेबुडकर यांची गीते यासाठी प्रसिद्ध आहे. मात्र तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल पण शांताराम बाबूंचा हा पिंजरा जर्मन फिल्म ‘द ब्लू एंजेल’वर आधारीत आहे. आणि हा जर्मन चित्रपट आधारीत आहे हाइनरिक मान यांची १९०५ सालची कादंबरी ‘प्रोफेसर अनरॅट’वर. ही जर्मन फिल्म जितकी लोकांनी आवडली त्यापेक्षा कित्येक अधिक पटींनी पिंजरा मराठी लोकांनी डोक्यावर घेतला. असे सांगितले जाते त्याकाळी हा चित्रपट इतका गाजला होता की या एका मराठी चित्रपटाने शांताराम बापूंचे त्याधीचे सर्व कर्ज फेडण्यास मदत केली होती.
३) दुनियादारी – मराठीमध्ये फार कमी चित्रपट आहेत ज्यांनी यशाची सर्व शिखरे पार केलेली आहेत, त्यापैकीच एक आहे ‘दुनियादारी’. प्रसिद्ध लेखक सुहास शिरवळकर यांच्या कादंबरीवर आधारीत संजय जाधव यांनी ‘दुनियादारी’ हा चित्रपट बनवला. स्वप्नील जोशी, सई ताम्हणकर, अंकुश चौधरी अशी उत्तम स्टारकास्ट असलेला दुनियादारी बॉक्स ऑफिसवर देखील प्रचंड गाजला.
४) शाळा – मिलिंद बोकील यांच्या शाळा या कादंबरीवर सुजय डहाके यांनी शाळा हा चित्रपट बनवला. अंशुमन जोशी आणि केतकी माटेगांवकर यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. ही कादंबरी जितकी लोकांना भावली तितकाच चित्रपटही लोकांना आवडला.
५) नटरंग - ‘नटरंग’ हा चित्रपट आनंद यादव यांच्या ‘नटरंग’ कादंबरीवर आधारित होता. बऱ्याच काळानंतर या चित्रपटामुळे मराठी प्रेक्षकांचे पाय पुन्हा चित्रपटगृहाकडे वळले. या चित्रपटाने एका नव्या ढंगातील तमाशा आपल्यासमोर मांडला. अतुल आणि सोनाली कुलकर्णी यांच्या अभिनयामुळे देखील हा चित्रपट लोकांना आवडला.
६) माचीवरला बुधा - प्रख्यात लेखक गो. नी. दांडेकर यांची 'माचीवरला बुधा' ही कादंबरी एकेकाळी खूप गाजली होती. गोनीदांना त्यांच्या भ्रमणकाळात एका दुर्गम माचीवर 'बुधा' नावाची व्यक्ती सापडली आणि 'माचीवरला बुधा' या कादंबरीचा जन्म झाला. विजयदत्त यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटामध्ये बुधा या नायकाची भूमिका ज्येष्ठ अभिनेते सुहास पळशीकर यांनी साकारली असून स्मिता गोंदकर, भगवान पाचोरे, नितीन कुलकर्णी आणि बालकलाकार कृष्णादत्त आदी सहकलाकारांच्या भूमिका यात आहेत.
७) जैत रे जैत – मराठी चित्रपटसृष्टीमधील एक मैलाचा दगड म्हणून गो.नी.दांडेकर यांच्या जैत रे जैतकडे पहिले जाईल. याच कादंबरीवर जब्बार पटेल यांचा जैत रे जैत १९७७ साली प्रदर्शित झाला. मोहन आगाशे, स्मिता पाटील, मिळू फुले, सुलभा देशपांडे यांच्या अभिनयाला या चित्रपटामुळे एक वेगळी उंची प्राप्त झाली. निसर्गकवी ना. धों. महानोर यांनी प्रथमच चित्रपटासाठी गीतलेखन केले. त्यांनी शब्दबद्ध केलेली जांभूळ पिकल्या झाडाखाली, मी रात टाकली, आम्ही ठाकर ठाकर, नभं उतरू आलं, डोंगर काठाडी ठाकरवाडी ही गीते अजरामर झाली.
८) गारंबीचा बापू - श्री. ना. पेंडसे यांची ‘गारंबीचा बापू’ ही कादंबरी साठच्या दशकात प्रकाशित झाली आणि मराठी साहित्यात एक लोकविलक्षण प्रेमकहाणी जन्माला आली. दिग्दर्शक बाबा माजगांवकर यांनी १९८० साली याच कादंबरीवर चित्रपट बनवला. डॉ.काशिनाथ घाणेकर, गीता सिद्धार्थ, दत्ता भट, शांता जोग, डॉ. मोहन आगाशे यांच्या या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका होत्या.
९) सिंहासन - अरुण साधू यांच्या 'मुंबई दिनांक' व 'सिंहासन' या कादंबऱ्यातील निवडक प्रसंगावर आधारित जब्बार पटेल यांचा हा चित्रपट १९७९ साली प्रदर्शित झाला. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या 'सिंहासन' या चित्रपटात डॉ. श्रीराम लागू, अरुण सरनाईक, निळू फुले, नाना पाटेकर यांच्यासारखे दिग्गज कलावंत होते. या सिनेमाची पटकथा आणि संवाद विजय तेंडुलकर यांनी लिहिले होते. डॉ. पटेलांनी या चित्रपटासाठी बँकेकडून साडेचार लाख रुपयांचे कर्ज घेतले होते आणि तेवढ्याच पैशांत हा चित्रपट तयार देखील झाला होता.