'Smile Please' Anthem Song: 32 मराठमोळ्या कलाकारांची मांदीयाळी असलेले 'स्माईल प्लीज' सिनेमातील 'चल पुढे चाल तू' गाणे रसिकांच्या भेटीला!
तुम्ही पाहिलेत का?
Chal Pudhe Smile Please Anthem Song: मुक्ता बर्वे आणि ललित प्रभाकर या फ्रेश जोडीच्या 'स्माईल प्लीज' (Smile Please) या नव्या सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. सिनेमाचा टीझर, ट्रेलर आणि गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असून या सिनेमातील नवे गाणे रसिकांच्या भेटीला आले आहे. या गाण्याची खासियत म्हणजे यात 32 मराठमोळ्या कलाकारांची मांदीयाळी पाहायला मिळते. विक्रम फडणीस याचे दिग्दर्शन असल्यामुळे स्वाभाविकच वेगळं काहीतरी पाहायला मिळणार अशी आशा प्रेक्षकांना असणार. 'स्माईल प्लीज' सिनेमातील 'श्वास दे' गाणे रसिकांच्या भेटीला! (Watch Video)
सिनेमातील कलाकारांव्यतिरिक्त या गाण्यामध्ये महेश मांजरेकर, मृणाल कुलकर्णी, प्रिया बापट, शरद केळकर, श्रिया पिळगावकर, मिताली मयेकर, सई लोकूर, वैभव तत्त्ववादी, तेजस्विनी पंडित, सचिन पिळगावकर, उर्मिला मातोंडकर, सागरिका घाटगे, मेघा धाडे, भूषण प्रधान, हर्षदा खानविलकर ,सिद्धार्थ चांदेकर, रेणुका शहाणे, सोनाली खरे, चिन्मयी सुमित, मानसी नाईक, चिन्मय मांडलेकर, प्रार्थना बेहरे, स्पृहा जोशी, पुष्कर श्रोत्री, उमेश कामत या मराठी कलाकारांची झलक पाहायला मिळते.
'चल पुढे चाल तू' असे हे सकारात्मक आशयाचे गाणे मंदार चोळकर याने लिहिले आहे. तर रोहन रोहन यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्यावर अवधूत गुप्ते, मुग्धा कऱ्हाडे, बेला शेंडे, रोहन प्रधान, सचिन पिळगावकर आणि ग्वेन डायस यांनी स्वरसाज चढवला आहे.
पहा गाणे:
या सिनेमात मुक्ता बर्वे एका फोटोग्राफरच्या भूमिकेत दिसत आहे. आयुष्यातील चढ-उतारात कसे हसत राहावे, हा संदेश या सिनेमातून देण्यात आला आहे. 'हृदयांतर' नंतर विक्रम फडणीस याचा हा दुसरा मराठी सिनेमा आहे. यात सिनेमात मुक्ता बर्वे आणि ललित प्रभाकर यांच्या शिवाय प्रसाद ओक, अदिती गोवित्रीकर, तृप्ती खामकर या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. 19 जुलैला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.