IPL Auction 2025 Live

Bhonga Movie Trailer: 'भोंगा' धार्मिक नाही तर सामाजिक समस्या, 'भोंगा' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

भोंगा या चित्रपटाच्या ट्रेलरच्या सुरुवातीला चित्रपटाच्या टीमने मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे विशेष आभार मानले आहे.

Bhonga

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘भोंगा’ (Bhonga) हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी चांगला लोकप्रिय ठरत आहे. या चित्रपटाच्या पोस्टरने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर आता मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटरवर या चित्रपटाचा ट्रेलर (Trailer) प्रदर्शित झाल्याची माहिती दिली आहे. त्यासोबत त्यांनी या चित्रपटाच्या ट्रेलरची युट्यूब लिंकही या पोस्टमध्ये दिली आहे. प्रार्थना देवापर्यंत पोहोचण्यासाठी खरंच भोंग्याची गरज असते? असे कॅप्शनही त्यांनी या पोस्टला दिले आहे. भोंगा या चित्रपटाच्या ट्रेलरच्या सुरुवातीला चित्रपटाच्या टीमने मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे विशेष आभार मानले आहे.

हा चित्रपट ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी एका वेगळ्या अनुषंगाने चित्रित करण्यात आला आहे. सततच्या आवाजाने रडणारी लहान मुले, आजारी माणसे आणि वयोवृद्धांना होणारा त्रास आणि इतके होऊनही यावर न निघणारा तोडगा असं सर्वच या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर २ मिनिट ५५ सेकंदाचा आहे.

‘भोंगा’ या चित्रपटाची कथा ही अजानवर भाष्य करणारी आहे. एका कुटुंबातील नऊ महिन्याच्या बाळाला Hypoxic Ischemic Encephalopathy हा गंभीर आजार झालेला असतो. अजानच्या भोंग्यामुळे या बाळाच्या तब्येतीवर दिवसेंदिवस परिणाम होतो. बाळाला होणारा त्रास संपूर्ण गाव तर पाहत असतो. पण हे थांबवण्यासाठी कोणकोणते प्रयत्न केले जातात? हे या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. अजाणावर भाष्य करणारा हा राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट येत्या ३ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.

अमेय खोपकर, संदीप देशपांडे आणि अमोल कागणे फिल्म्स निर्मित भोंगा या चित्रपटाची निर्मिती शिवाजी लोटन पाटील, अर्जुन हिरामण महाजन आणि अमोल लक्ष्मण कागणे यांनी केली आहे. या चित्रपटात दीप्ती धोत्रे, कपिल गडसूरकर, अमोल कागणे, श्रीपाद जोशी, आकाश घरत, दिलीप डोंबे, सुधाकर बिराजदार, अरुण गीते, महेंद्र तिजगे, रमेश भोळे आणि दिपाली कुलकर्णी हे कलाकार प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी केले आहे. (हे देखील वाचा: Sersenapati Hambirrao: स्नेहल तरडे साकारणार "सौ. लक्ष्मीबाई हंबीरराव मोहिते" यांची भूमिका)

या चित्रपटाची कथा आणि संवाद शिवाजी लोटन पाटील आणि निशांत धापसे लिखित आहेत. तर चित्रपटातील गाणी विजय गटलेवार यांची आहे. तर गाण्याचे बोल सुबोध पवार लिखित आहेत. चित्रपटाचे संकलन निलेश गावंड यांनी केले आहे. या चित्रपटाच्या सिनेमॅटोग्राफीची जबाबदारी रामनी रंजन दास यांनी सांभाळली आहे.