मराठीत शिक्षण झालेल्या उमेदवारांना पालिकेने नाकारली नोकरी; अभिनेत्री चिन्मयी सुमित यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली 'ही' मागणी
मराठी शाळेत शिक्षण झाल्याने मुंबई पालिकेत काही तरुण-तरुणींना नोकरी नाकारण्यात आली आहे, यासाठी 150 तरुण आणि तरुणी गेले 25 दिवस आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत, दरम्यान, यांच्या मदतीला मराठी शाळांच्या सदिच्छादूत अभिनेत्री चिन्मयी सुमित धावून आल्या आहेत.
मराठी शाळेत शिक्षण झाल्याने मुंबई पालिकेत (Mumbai Municipal Corporation) काही तरुण-तरुणींना नोकरी नाकारण्यात आली आहे. यासाठी 150 तरुण आणि तरुणी गेले 25 दिवस आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत. दरम्यान, यांच्या मदतीला मराठी शाळांच्या सदिच्छादूत अभिनेत्री चिन्मयी सुमित (Chinmayi Sumit) धावून आल्या आहेत. त्यांनी या तरुणांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी मुख्यंमत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र लिहिले आहे. तसंच उमेदवारांना तातडीने कामात रुजू करुन घ्यावे, अशी मागणीही केली आहे.
मुंबई पब्लिक स्कूल या पालिकेच्या शाळांमध्ये नोकरी मिळवण्यासाठी उमेदवाराचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण फक्त इंग्रजी माध्यमातच असणे बंधनकारक आहे, असा 2008 साली ठराव करण्यात आला होता. त्या आधारावर तब्बल 150 तरुणांना नोकरी नाकारण्यात आली आहे. दरम्यान, पात्र उमेदवारांना इतर उपलब्ध पर्यायातून नोकरीची संधी द्यावी, यासाठी शिक्षण विभागाने अनुकूलता दर्शवली आहे. मात्र मुंबई महापालिकेकडून त्यांना न्याय देण्यात आलेला नाही. त्यामुळे 1 फेब्रुवारी 2021 पासून सर्व उमेदवार आझाद मैदान येथे आंदोलन करत आहेत.
या तरुणांसाठी मराठी शाळांच्या सदिच्छादूत अभिनेत्री चिन्मयी सुमीत, मराठी अभ्यास केंद्र, मराठी एकीकरण समिती आणि शिक्षक संघटना यांनी राज्य शासन आणि मुंबई महानगरपालिका यांच्याकडे एकत्रितपणे मागणी केली आहे. यात त्यांनी म्हटले की, अन्यायाविरोधात आंदोलन करणाऱ्या सर्व उमेदवारांना आमचा पाठिंबा असून मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई पब्लिक स्कूल संबंधातला 2008 चा ठराव रद्द करुन या उमेदवारांना तातडीने सेवेत रुजू करून घ्यावे.
दरम्यान, यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिण्यात आले असून संवेदनशील आणि मराठीप्रेमी मुख्यमंत्री याची नक्कीच दखल घेतील, असेही म्हटले आहे.