पहिला चित्रपट सुपरहीट होऊन, रातोरात स्टार बनूनही मधुबालाला मिळत नव्हते काम

तिचे सौंदर्य, अभिनय, अदा यांच्यावर एककेकाळी उड्या पडलेल्या आहेत

मधुबाला (संग्रहित-संपादित प्रतिमा)

आजही लाखो दिलांची धडकन असलेली मधुबाला (Madhubala), भारतीय चित्रपटसृष्टीमधील सर्वात सुंदर अभिनेत्री मानली जाते. तिचे सौंदर्य, अभिनय, अदा यांच्यावर एककेकाळी उड्या पडलेल्या आहेत. तिला पडद्यावर पाहताना जितके पुरुष घायाळ व्हायचे तितक्याच स्त्रियांना तिच्याबद्दल मत्सर वाटायचा. तिचे सौंदर्यच इतके अफलातून होते की तिने अभिनय नाही केला तरी चालायचे. फक्त तिला पडद्यावर पाहण्यासाठी त्याकाळी कित्येकांनी मुघल-ए-आझम कैक वेळा पहिला आहे. अवघ्या 36 वर्षांच्या आयुष्यात मधुबालाने जे चित्रपटसृष्टीला दिले आहे त्याचे पुढे कित्येक दशके चाहत्यांचा मनावर गारुड भरून राहणार आहे.

मधुबालाला अभिनेत्री व्हायचे आहे म्हणून ती चित्रपटात आली असे मुळीच नव्हते. गरिबीच्या, हलाखीच्या परिस्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हावा म्हणून तिच्या पित्याने तिला निर्माता, दिगदर्शकांसमोर उभे केले. पन्नाशीच्या दशकाचा तो काळ होता, चित्रपटसृष्टी आकारास येत होती. मधुबालाच्या पित्याला आपल्या मुलीच्या सौंदर्याची जाणीव होती. म्हणूनच चार पैसे गाठीस लागावे या हिशोबाने तो बॉम्बे टॉकीजच्या दारात उभा राहिला. दरवानाला चार पैसे चारून त्याने आतमध्ये प्रवेश केला. त्यावेळी तिथे 'बसंत' (Basant) या चित्रपटाचे शुटींग चालू होते. उल्हास आणि मुमताजशांती हे मुख्य भूमिकेत होते तर अमिया चक्रवर्ती दिग्दर्शक. चक्रवर्ती साहेबांनी बेबी मधुबालाला पाहताच त्यांना ती आवडून गेली. त्यांनी तिला हिंदीतून काही प्रश्न विचारले, स्क्रिनटेस्ट झाली आणि मधुबालाला पहिला चित्रपट मिळाला. इतक्या सहजतेने या महान नायिकेने चित्रपटसृष्टीमध्ये पाऊल ठेवले. महिना दीडशे रुपये असा तिचा त्यावेळचा पगार होता. त्यावेळी मधुबालाचे वय होते अवघे 8 वर्षे.

चित्रपटात काम मिळावे यासाठी मधुबाला आपल्या पित्यासोबत मुंबईमध्ये राहत होती, तर बाकीचे कुटुंब दिल्लीमध्ये होते. मधुबालासोबत राहायला, तिला सपोर्ट करायला दुसरे असे कोणीच नव्हते. काही दिवसांत ‘बसंत’चे शुटींग सुरु झाले. मधुबालाला काही सीन्स, काही संवादही देण्यात आले होते. चेहऱ्याला रंग लावून पहिल्यांदा मधुबाला कॅमेरासमोर उभी राहिली. ती बिचकली नाही, बावरली नाही. अमियाजींनी आधी करून घेतलेल्या तालामिनुसार तिने माफक अभिनय केला, दोन-तीन वाक्यही म्हटली. पहिल्या टेकमध्ये शॉट ओके झाला. अमियाजी चकित झाले. सेटवर सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला. (हेही वाचा : या सावळ्या अभिनेत्री गाजवत आहेत बॉलीवूडवर अधिराज्य)

या चित्रपटात फक्त अभिनयच नाही तर मधुबालाने गाणीही गायली होती. चित्रपटाचा शेवटचा सीन नायक, नायिका आणि मधुबालावर चित्रित झाला. तर शेवट झाला तो बेबी मधुबालाने गाणे गात केलेल्या अभिनयावर. 1942 ला चित्रपट प्रदर्शित झाला आणि नशीब फळफळल. लाहोर पासून मुंबईपर्यंत, दिल्ली पासून मद्रास पर्यंत बसंतने सर्वत्र गर्दी खेचायला सुरुवात केली. काही दिवसांतच प्रेक्षकांनी हा चित्रपट डोक्यावर घेतला. या चित्रपटाने रौप्य महोत्सव साजरा केला. तगडे कलाकार नसूनही हा चित्रपट लोकप्रिय झाला म्हणून, लोकांनी हा चित्रपट सुपरहिट होण्यामागची कारणे शोधायला सुरुवात झाली. तेव्हा गाण्यांसोबत या चित्रपटातील बाल कलाकार बेबी मधुबाला लोकांना भावली असल्याचे समोर आले. तिचा गोंडस चेहरा, अभिनय, निरागसता लोकांना प्रचंड आवडली होती. यामुळे रातोरात मधुबाला स्टार बनली. कित्येक बायाबापड्यांनी फक्त बेबी मधुबालासाठी हा चित्रपट अनेकवेळा पहिला.

मात्र बसंतचे यश मधुबालाच्या खिजगणतीतही नव्हते. ती स्वतः स्टार बनली आहे याची तिला कल्पनाही नव्हती. कारण तिच्या समोर सर्वात मोठा प्रश्न उभा ठाकला होता तो म्हणजे कुटुंबाचा उदरनिर्वाह. ‘बसंत’नंतर मुंबईत राहणे परवडण्यासारखे नव्हते. अशातच त्याकाळी तयार होत असलेल्या चित्रपटांमध्ये मधुबालाला साजेशी असेल अशी एकही भूमिका नव्हती. शेवटी पैश्याचे सोंग आणता येत नाही असे म्हणत मधुबाला आपल्या पित्यासह दिल्लीला परतली. मात्र चिखलात कमळ उगवते, या उक्तीनुसार लवकरच मधुबाला मुंबईत परत येणार होती ती या चित्रपटसृष्टीवर राज्य करण्यासाठी.