Iran Hijab Row: इराणमधून उठलेली हिजाबची ठिणगी तुर्कीपर्यंत पोहोचली; प्रसिद्ध गायिका Melek Mosso ने स्टेजवरच कापले स्वतःचे केस (Watch Video)
इराणमध्ये हिजाबबाबत खूप कडक कायदे करण्यात आले आहेत. मात्र आता इराणमध्ये आता एकच आवाज घुमत आहे... NO MORE हिजाब!
इराणमध्ये हिजाबविरोधातील आंदोलन (Iran Hijab Row) अजूनही सुरू आहे. हिजाब क्रांतीचा बुलंद आवाज आता केवळ इराणमध्येच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये गुंजत आहे. गेल्या 11 दिवसांपासून इराणमध्ये हिजाबच्या विरोधात उग्र निदर्शने सुरू आहेत. इराणच्या कानाकोपऱ्यात ज्वालामुखी बनून निषेधाची ठिणगी पेटली आहे. इराणमध्ये तेहरान, बाबोल, अमोल आणि फरदीसह सुमारे 46 शहरांमध्ये हिजाबविरोधात आवाज तीव्र झाला आहे. आंदोलक रस्त्यावर उतरून तीव्र निषेध करत आहेत. अशाप्रकारे 17 सप्टेंबरपासून सुरू झालेला हिजाबचा वाद चांगलाच चिघळत चालला आहे.
या वादात आतापर्यंत सुमारे 75 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, याशिवाय 700 हून अधिक लोकांना अटकही करण्यात आली आहे. या लढ्यात इराणच्या महिलांना जगाच्या कानाकोपऱ्यातून पाठिंबा मिळत आहे. या आंदोलनाला एका प्रसिद्ध तुर्की गायिकेनेही (Turkish Singer Melek Mosso) पाठिंबा दिला आहे. गायिका मेलेक मोसोचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मेलेक मोसो स्टेजवर उभे राहून जाहीरपणे आपले केस कात्रीने कापताना दिसत आहे.
22 वर्षीय मेहसा अमिनीच्या मृत्यूनंतर हे आंदोलन सुरु झाले आहे. या निष्पाप मुलीचा दोष एवढाच होता की, तिने तिला हिजाब नीट घातला नव्हता. 13 सप्टेंबर रोजी महसा तिच्या कुटुंबासह बाहेर फिरायला गेली होती. यावेळी हिजाब नीट न घातल्यामुळे तिचे काही केस दिसत होते. त्यामुळे इराणच्या एथिक्स पोलिसांनी महसाला अटक केली आणि तिथे तिला बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर ती कोमात गेली व 3 दिवस कोमात राहिल्यानंतर तिचा मृत्यू झाला. (हेही वाचा: इराणमध्ये हिजाबविरोधी निदर्शने, उफाळला हिंसाचार; 41 जणांचा मृत्यू, 700 जणांना अटक)
मेहसाच्या मृत्यूनंतर इराणमध्ये हिजाबविरोधात आंदोलन सुरु झाले, ज्याचे पडसाद जगभरात उमटत आहेत. जगभरातील महिला आपले केस कापून या आंदोलनाचा भाग बनत आहेत. इराणमध्ये हिजाबबाबत खूप कडक कायदे करण्यात आले आहेत. मात्र आता इराणमध्ये आता एकच आवाज घुमत आहे... NO MORE हिजाब!