Friends: The Reunion: तब्बल 17 वर्षानंतर ते 6 मित्र पुन्हा चाहत्यांच्या भेटीला; 27 मेला HBO Max वर प्रदर्शित होणार 'फ्रेंड्स: द रीयूनियन'
90 च्या दशकामध्ये या शोने संपूर्ण जगभरात धुमाकूळ घातला होता. 6 मित्र आणि त्यांच्यामधील बंध, त्यांची जीवनगाथा पडद्यावर दर्शवणाऱ्या या शोने कित्येक रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत
टेलीव्हिजनच्या क्षेत्रातील सर्वात लोकप्रिय शोजमध्ये ‘फ्रेंड्स’ (Friends) हा शो अजूनही अव्वल आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. 90 च्या दशकामध्ये या शोने संपूर्ण जगभरात धुमाकूळ घातला होता. 6 मित्र आणि त्यांच्यामधील बंध, त्यांची जीवनगाथा पडद्यावर दर्शवणाऱ्या या शोने कित्येक रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. आजही जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात फ्रेंड्सचे चाहते आढळतात. आता तब्बल 17 वर्षानंतर हा शो 'फ्रेंड्स: द रीयूनियन' (Friends: The Reunion) द्वारे पुन्हा चाहत्यांच्या भेटीला येत आहे. एचबीओ मॅक्सचा (HBO Max) हा बहुप्रतिक्षित शो 27 मे रोजी प्रसारित होईल.
जेनिफर एनिस्टन (Jennifer Aniston), कोर्टनी कॉक्स (Courteney Cox), लिसा कुड्रो (Lisa Kudrow), मॅट लेब्लांक (Matt LeBlanc), मॅथ्यू पेरी (Matthew Perry) आणि डेव्हिड श्विमर (David Schwimmer) अशा सहा कलाकारांनी 6 मित्रांची भूमिका साकारली होती. 22 सप्टेंबर 1994 रोजी या शोचा पहिला एपिसोड प्रसारित झाला होता. त्यानंतर तब्बल 10 वर्षे या शोने लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. 6 मे 2004 रोजी या शोचा शेवटचा भाग प्रसारित झाला. कित्येक लोकांसाठी हा फक्त एक शो नसून ती एक भावना आहे. त्यामुळे 27 मे रोजी प्रसारित होणारा 'फ्रेंड्स: द रीयूनियन' हा चाहत्यांसाठी फार मोठी पर्वणी असणार आहे.
गुरुवारी याचा टीझर ट्रेलर रिलीज करत एचबीओ मॅक्सने ही माहिती दिली. 'एचबीओ मॅक्स' सुरू होऊन एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 'फ्रेंड्स: द रियुनियन' प्रसारित केले जात आहे. या शोचे शूटिंग फेब्रुवारी 2020 मध्ये सुरु होणार होते, परंतु कोविड-19 या शोच्या निर्मितीला वेळ लागला आणि अखेर या वर्षी एप्रिलमध्ये त्याचे शुटिंग सुरू झाले. (हेही वाचा: Farhan Akhtar लवकरच झळकणार Marvel Studios सोबत एका आंतरराष्ट्रीय कलाकृतीमध्ये, Bangkok मध्ये शुटिंग सुरू - रिपोर्ट्स)
महत्वाचे म्हणजे, डेव्हिड बेकहॅम, जस्टीन बीबर, बीटीएस, जेम्स कॉर्डन, सिंडी क्रॉफर्ड, कारा डेलिव्हिंग्ने, लेडी गागा, इलियट गोल्ड, किट हॅरिंग्टन, लॅरी हॅन्किन, मिंडी कॅलिंग, थॉमस लेनन, क्रिस्टीना पिकल्स, टॉम सेलेक, जेम्स मायकेल टायलर, मॅगी व्हीलर, रीझ विदरस्पूनआणि मलाला युसूफझईसारखे तारे या शोमध्ये पाहुण्यांच्या भूमिकेत दिसतील.