Dark Side of Mother Teresa: मदर तेरेसा यांनी लपवली चर्चमधील वाईट कृत्ये आणि घोटाळे; नव्या डॉक्युमेंटरीमध्ये धक्कादायक खुलासा
आता मदर तेरेसा यांच्यावर एक नवीन डॉक्युमेंटरी समोर आली आहे, ज्यामध्ये त्यांच्याबद्दल अत्यंत धक्कादायक दावे करण्यात आले आहेत
शांततेचे नोबेल पारितोषिक मिळालेल्या मदर तेरेसा (Mother Teresa) यांच्याबद्दल एका नव्या माहितीपटात खळबळजनक दावा करण्यात आला आहे. 'मदर तेरेसा: फॉर द लव्ह ऑफ गॉड' नावाच्या या माहितीपटात सांगण्यात आले आहे की, त्यांनी कॅथोलिक चर्चच्या अनेक वाईट कृत्यांवर पडदा टाकला. तसेच यामध्ये नमूद केले आहे की, मदर तेरेसा या लोकांना मदत करण्यापेक्षा गरिबी आणि वेदनांकडे अधिक आकर्षित झाल्याचे दिसून येते. डॉक्युमेंट्रीचा दावा आहे की त्या युद्धे थांबवू शकल्या असत्या, त्यांची अनेक राष्ट्रपतींशी मैत्री होती. त्यांनी जागतिक स्तरावर अनाथाश्रमांचे एक विशाल नेटवर्क तयार केले होते तसेच त्यांनी आजारी कैद्यांना तुरुंगातून मुक्त केले. परंतु मदर तेरेसा यांनी कॅथोलिक चर्चच्या वाईट कृत्यांवर पांघरूण घातले.
मदर तेरेसा यांना ओळखत नसेल अशी व्यक्ती क्वचितच आढळेल. भारतरत्न आणि शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेल्या मदर तेरेसा यांना पोप आणि व्हॅटिकन सिटीने ‘संता’चा दर्जा दिला आहे. गरीब, दीन, अनाथ आणि आजारी लोकांना मदत करण्यासाठी मदर तेरेसा नेहमीच तत्पर होत्या. निराधारांना मदत करण्यासाठी त्यांनी मिशनरीज ऑफ चॅरिटी ही मोठी संस्था स्थापन केली होती. मदर तेरेसा यांना नेहमीच दयाळू आणि लोकांना मदत करणारी व्यक्ती म्हणून संबोधले जात असे.
मदर तेरेसा यांच्यावर केवळ धार्मिक हेतूंसाठी काम केल्याचा आणि भारतातील समाजसेवेच्या नावाखाली धर्म परिवर्तन केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. आता मदर तेरेसा यांच्यावर एक नवीन डॉक्युमेंटरी समोर आली आहे, ज्यामध्ये त्यांच्याबद्दल अत्यंत धक्कादायक दावे करण्यात आले आहेत. यामध्ये मदर तेरेसा यांच्या जवळच्या काही लोकांशी झालेले संभाषण दाखवण्यात आले आहे, ज्यांना मदर तेरेसा यांच्यासोबत काम खूप वाईट अनुभव आला. मदर तेरेसा यांच्या कडव्या टीकाकारांशी बोलतांना या माहितीपटाच्या माध्यमातून या जगप्रसिद्ध संताचे जीवन नव्याने मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
या माहितीपटात मदर तेरेसा यांच्यावर गरिबी हटवण्यापेक्षा आणि लोकांना मदत करण्यापेक्षा थेट व्हॅटिकन सिटीच्या कॅथोलिक चर्चला जगभरातून निधी हस्तांतरित केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामध्ये मेरी जॉन्सन म्हणतात, मदर तेरेसा या त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या दशकात वृद्धापकाळाशी झुंज देत होत्या, परंतु तरीही व्हॅटिकन सिटीने त्यांना अशा प्रत्येक ठिकाणी पाठवले जेथे चर्चचे पाद्री बाल लैंगिक शोषणात गुंतलेले आढळले. चर्चमध्ये होणारे घोटाळे आणि गैरव्यवहार जगापासून लपवले जावेत म्हणून त्यांनी हे केले. (हेही वाचा: फ्रांसच्या चर्चमध्ये हजारो पाद्री आणि स्टाफकडून लहान मुलांवर लैंगिक अत्याचार; रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा)
जॅक प्रागर म्हणतात, ‘गरिबांसाठी चांगले हॉस्पिटल चालवण्यासाठी मदर तेरेसा यांच्याकडे पैसे होते, पण त्यांनी तसे कधीच केले नाही. कोणताही उपचार न करता आम्ही दुःखाचा अंत करण्यासाठी प्रार्थना करू, असे त्या म्हणत असत. दुःख हे केवळ मदर तेरेसा यांच्या कार्याचे उप-उत्पादन नव्हते, तर तो त्यांचा अविभाज्य भाग होता. त्यांनी नन्सना स्वतःला चाबकाने फटके मारण्याची आणि काटेरी साखळ्या घालण्याची सूचना दिली होती. हा माहितीपट 9 मे रोजी स्काय डॉक्युमेंटरीजवर प्रसारित होणार आहे. ही डॉक्युमेंटरी 3 भागांची आहे.