Coldplay Announces Retirement: चाहत्यांना धक्का! ब्रिटनचा प्रसिद्ध रॉक बँड 'कोल्डप्ले'ने केली निवृत्तीची घोषणा, 12 व्या अल्बमनंतर थांबवणार काम
ज्या बँडच्या परफॉर्मन्सची तिकिटे भारतात काळ्या बाजारात विकली जात आहेत तो आता लवकरच निवृत्त होणार आहे.
Coldplay Announces Retirement: ब्रिटनचा प्रसिद्ध रॉक बँड 'कोल्डप्ले' सध्या भारतात चर्चेत आहे. कोल्डप्लेचा कॉन्सर्ट पुढील वर्षी जानेवारीत मुंबईत होणार आहे. नुकतेच या कार्यक्रमाचे बुकिंग सुरू करण्यात आले. आता मुंबईतील कोल्डप्ले कॉन्सर्टच्या तिकिटांच्या कथित काळाबाजाराचे प्रकरण वाढत आहे. आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) ऑनलाइन तिकीट एग्रीगेटर बुकमायशोच्या (BookMyShow) च्या चीफ ऑपरेटिंग ऑफिसरचे (COO) या प्रकरणाबाबत स्टेटमेंट नोंदवले आहे. कोल्डप्ले कॉन्सर्ट तिकिटांच्या कथित काळाबाजाराबद्दल वकील अमित व्यास यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली आहे. अशात कोल्डप्ले बँडने एक मोठा निर्णय घेतल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. कोल्डप्लेने त्यांची निवृत्ती जाहीर केली आहे.
कोल्डप्ले या बँडने अलीकडेच सांगितले कि, ते त्यांच्या 12 व्या स्टुडिओ अल्बमच्या प्रकाशनानंतर निवृत्त होणार आहेत. ज्या बँडच्या परफॉर्मन्सची तिकिटे भारतात काळ्या बाजारात विकली जात आहेत तो आता लवकरच निवृत्त होणार आहे. क्रिस मार्टिनने एका मुलाखतीत याची पुष्टी केली आणि सांगितले की यानंतर तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर अधिक लक्ष केंद्रित करेल. तो व्यावसायिकरित्या निवृत्त होणार आहे. बँडने आतापर्यंत नऊ अल्बम रिलीज केले आहेत आणि त्यांचा 10 वा अल्बम 'मून म्युझिक' 4 ऑक्टोबर रोजी येत आहे.
ख्रिस मार्टिनने 'Apple Music 1' शी केलेल्या संभाषणात सांगितले की, 'आम्ही फक्त 12 उत्कृष्ट अल्बम बनवू. ही संख्या आमच्यासाठी गुणवत्ता टिकवून ठेवण्याचा एक मार्ग आहे आणि आता श्रोत्यांच्या मनाला भिडणारे गाणे निवडणे खूप अवघड आहे.’ त्याने यावेळी हॅरी पॉटरची फक्त सात पुस्तके आणि 12½ बीटल्स अल्बम, याकडे, लक्ष वेधले. ख्रिस म्हणाला की बँड निवृत्त होत असला तरी तो आणि जॉनी बकलँड, गाय बेरीमन आणि विल चॅम्पियन असे इतर सदस्य वेगवेगळ्या प्रकल्पांवर काम करत राहतील. (हेही वाचा: Coldplay Mumbai Concert: कोल्डप्ले कॉन्सर्टबाबत BookMyShow वर तिकिटांचा काळाबाजार करण्याचा कट रचल्याचा आरोप; EOW ने सीइओआणि अधिकाऱ्यांना बजावले समन्स)
दरम्यान, मुंबईत जानेवारी 2025 मध्ये कोल्डप्ले आपली कला प्रदर्शित करणार आहे. मात्र, या कार्यक्रमाची तिकिटे काही मिनिटांतच विकली गेली आणि नंतर ती लाखोंच्या किमतीत काळ्या बाजारात उपलब्ध झाली. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी बुक माय शोच्या सीईओला तिकीट घोटाळ्याच्या आरोपावरून चौकशीसाठी बोलावले आहे. या प्रकरणी सोशल मीडियावर ही मैफल रद्द होण्याचीही चर्चा आहे.