Cheat India ने रिलिज डेट पुढे ढकलली; 'ठाकरे' सोबतची टक्कर टळली

हिंदी सिनेमांमुळे मराठी सिनेमांची होणार परवड रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचा अंदाज आहे.

चीट इंडियाची रिलिज डेट पुढे ढकलली (File Photo)

बहुचर्चित सिनेमा 'ठाकरे'चा (Thackeray) दमदार ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. ट्रेलरने सिनेमाविषयीची उत्सुकता अधिकच वाढवली. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जीवनपट 'ठाकरे' या सिनेमातून रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. यात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) बाळ ठाकरेंच्या भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा 25 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

याच दिवशी दोन हिंदी सिनेमे प्रदर्शित देखील होणार होते. एक म्हणजे 'चीट इंडिया' (Cheat India) आणि दुसरा 'मणिकर्णिका- द क्विन ऑफ झासी' (Manikarnika The Queen Of Jhansi). मणिकर्णिका या सिनेमात बॉलिवूडची क्विन कंगना रानौत झाशीच्या राणीच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र काही दिवसांपूर्वी 25 जानेवारीला फक्त 'ठाकरे' सिनेमा प्रदर्शित होणार असल्याची घोषणा शिवसेनेचे सरचिटणीस बाळा लोकरे (Bala Lokare) यांनी केली होती. त्यामुळेच आता ठाकरेसोबतची टक्कर टाळण्यासाठी इमरान हाशमीच्या 'चीट इंडिया'ची रिलिज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. आता झाशीच्या राणीची जीवनकहाणी सांगणारा 'मणिकर्णिका' या सिनेमाबद्दल काय निर्णय घेतला जाईल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

हिंदी सिनेमांमुळे मराठी सिनेमांची होणार परवड रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचा अंदाज आहे. कारण 'सिम्बा' या बॉक्स ऑफिसवर गाजणाऱ्या सिनेमासाठी महेश मांजरेकर यांच्या 'भाई-व्यक्ती की वल्ली' या मराठी सिनेमाला मुंबई-पुण्यात पुरेशी थिएटर मिळण्यास अडथळा येत आहे.