नाटकावर आधारलेले हे '५' सुपरहिट मराठी सिनेमे !
दोन्ही माध्यमातलं वेगळेपण जपत नाटकांचे यशस्वी रुपांतरीत झालेले सिनेमे.
नाटकाचे सिनेमात रुपांतर करणे तसे फार नवे नाही. पण नाटकाचा सिनेमा करणं हे तसं जोखमीचं काम. दिग्दर्शकासोबत कलाकारांवरही प्रचंड जबाबदारी असते. दोन्ही माध्यमातलं वेगळेपण जपत आणि नाटकात जे दाखवता आलं नाही ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला असतो. हे माध्यमांतर यशस्वी झालेले काही सिनेमे...
सविता दामोदर परांजपे
सविता दामोदर परांजपे हा अलिकडेच प्रदर्शित झालेला सिनेमा. सिनेमाचा ट्रेलर पाहुन प्रेक्षकांमध्ये सिनेमाविषयीच कुतुहल अधिकच वाढलं होतं. शेखर ताम्हाणेंनी लिहिलेल्या या नाटकाला रिमा लागूंच्या अभिनयाने चार चाँद लावले. तर नाटकाच्या यशात दिग्दर्शक राजन ताम्हाणेंचा ही मोलाचा सहभाग होता. याच नाटकांच यशस्वीपणे माध्यमांतर करण्यात आलं आणि जणू नवा सिनेमाच प्रेक्षकांच्या भेटीला आला. तृप्ती तोरडमल आणि सुबोध भावे यांच्या अभिनयाने नटलेल्या सिनेमाचे दिग्दर्शन स्वप्ना वाघमारे जोशी यांनी केलं आहे.
कट्यार काळजात घुसली
१९६७ साली आलेल्या कट्यार काळजात घुसली या संगीत नाटकात जेष्ठ शास्त्रीय गायक वसंतराव देशपांडे यांची प्रमुख भूमिका होती. अजरामर झालेल्या या कलाकृतीचा सिनेमा बनवण्याचे धाडस अभिनेता सुबोध भावे याने दिग्दर्शनातील पर्दापणातच केले. २०१५ साली आलेल्या या सिनेमालाही प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. हे नाटक पुरुषोत्तम दारव्हेकर यांनी लिहिले असून त्याला पं. जितेंद्र अभिषेकी यांनी संगीत दिले होते. तर सिनेमाच्या गाण्यांची पूर्ण जबाबदारी राहुल देशपांडे, महेश काळे आणि शंकर महादेवन यांनी सांभाळली असून शंकर-एहसान-लॉय यांनी ती संगीतबद्ध केली आहेत.
नटसम्राट
विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रजांच्या लेखणीतून अवतरलेलं नाटक हे नाटक. यातील गणपतराव ऊर्फ अप्पासाहेब बेलवलकर ही प्रमुख भूमिका डॉ. श्रीराम लागू यांनी अनेक वर्षे रंगवली. डॉ. श्रीराम लागू यांनी ही भूमिका अशा पातळीवर नेऊन ठेवली की पुन्हा ती भूमिका साकारणे म्हणजेच शिवधनुष्य पेलण्यासारखे होते. पण हे शिवधनुष्य पेलण्याचा योग अभिनेते नाना पाटेकरांच्या वाटी आला आणि त्यांनीही या संधीचे सोने केले. महेश मांजरेकर दिग्दर्शित नटसम्राट या २०१६ साली आलेल्या सिनेमात नाना पाटेकर अप्पासाहेब बेलवलकर म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आले.
टाईम प्लीज
नवा गडी.. नवं राज्य हे नाटक म्हणजे ऋषी आणि अमृता या नवविवाहीत जोडप्याची गोष्ट आहे. यात उमेश कामत आणि प्रिया बापट प्रमुख भूमिकेत आहेत. याच नाटकावर आधारित 'टाईम प्लीज' हा सिनेमा आहे. यातही उमेश आणि प्रिया यांच्या मुख्य भूमिका आहेत. नाटक यशस्वी झाल्यानंतर त्याचा सिनेमा करण्याचा प्रयोग करण्यात आला.
आपला मानूस
नाटक ते सिनेमा असा प्रवास करणार अजून एक सिनेमा म्हणजे आपला मानूस. काही वर्षांपूर्वी रंगभूमीवर आलेले डॉ. विवेक बेळे यांनी लिहिलेले व गिरीश जोशींनी दिग्दर्शित केलेले काटकोन त्रिकोण. मोहन आगाशेंची प्रमुख दुहेरी भूमिका असलेल्या या नाटकाच्या कथेवर नाना पाटेकर यांचा 'आपला मानूस' या सिनेमाची गोष्ट बेतलेली आहे. सिनेमाचे दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केलेले आहे.