Hero-chi-Wadi: महाराष्ट्रात जन्माला आली ‘हिरोची वाडी’; अभिनेता इरफान खान याच्या स्मरणार्थ गावाचे नामकरण, वाचा काय आहे कहाणी

मात्र लोक अजूनही त्याच्या संबंधित गोष्टी, फोटो इ. शेअर करून त्याच्या आठवणी जागवत आहेत.

इरफान खान (File Photo)

आपल्या अभिनयामुळे आणि आपल्या साध्या स्वभावामुळे लोकांच्या हृदयात विशिष्ट स्थान निर्माण करणारा अभिनेता इरफान खान (Irrfan Khan) आता आपल्यात नाही. मात्र लोक अजूनही त्याच्या संबंधित गोष्टी, फोटो इ. शेअर करून त्याच्या आठवणी जागवत आहेत. बॉलिवूडचे अनेक सेलेब्स इरफानसाठी अजूनही विविध पोस्ट करत आहेत. दरम्यान, इरफान खानच्या निधनानंतर महाराष्ट्रातील एका गावाने चक्क आपल्या गावाचे नावच बदलले आहे. आता या गावाचे नाव खास इरफानच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. नाशिक जिल्यातील इगतपुरी (Igatpuri) तालुक्यातील त्रिंगलवाडी गावाने आपल्या गावाचे नाव ‘हिरोची वाडी’ (Hero-chi-Wadi) असे ठेवले आहे.

या गावात आजूबाजूच्या परिसरात एकही सिनेमा थिएटर नाही, परंतु गेल्या 10 वर्षांपासून इरफानचा प्रत्येक चित्रपट हे गावकरी पाहत आहेत. गावकरी खास इरफान खानचा चित्रपट पाहण्यासाठी 30 किमी दूर नाशिकला जातात. आता गावकऱ्यांनी आपल्या आवडत्या अभिनेत्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी या भागाचे नाव बदलून 'हीरोची वाडी' असे केले आहे. इरफानने या गावाच्या विकासासाठी खूप मदत केली आहे. 10 वर्षांपूर्वी तो प्रथमच इगतपुरीला आला होता त्यावेळी त्याने इथे घर विकत घेतले होते. आता हे घर काही आदिवासींसाठी त्यांचे राहण्याचे ठिकाण बनले आहे.

(हेही वाचा: दीपिका पादुकोण ने इरफान खान सोबत बॅडमिंटन खेळतानाचा व्हिडिओ केला शेअर, या दिवंगत अभिनेत्याला केली 'ही' विनंती)

इरफानने गावकऱ्यांना रुग्णवाहिका मिळवून दिली. तिथल्या शाळेसाठी देखील मदत केली आणि मुलांना पुस्तके दिली. इतकेच नाही तर इरफानवर अमेरिकेत कर्करोगाचा उपचार सुरू असतानाही त्याने इथल्या मुलांना मदत पाठवली होती. इरफानने जेव्हा या गावात जमीन विकत घेतली तेव्हाच गावातील लोकांना  आपल्या गावाचे नाव बदलायचे होते. अशाप्रकारे या खेड्यातील लोक इरफान खानवर खूप प्रेम करतात व आता त्याच्या जाण्यामुळे या गावाचे नाव बदलण्यात आले.