पानिपत चित्रपट प्रदर्शित करू नये, शिंदे सरकारकडून याचिका दाखल; 2 डिसेंबर रोजी पुण्यात पार पडणार सुनावणी
पानिपत चित्रपट प्रदर्शित होऊ नये म्हणून, सरदार महादजी शिंदे यांच्या परिवारातील, उत्तमराव शिंदे सरकार (Uttamrao Shinde Sarkar) यांनी पुण्याच्या न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे.
ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासू पानिपत (Panipat) चित्रपटामागे लागलेली पनवती संपायचे काही नाव घेत नाही. काही दिवसांपूर्वी प्रख्यात साहित्यिक विश्वास पाटील (Vishwas Patil) यांनी या चित्रपटाची कथा, प्रसंग, पात्रे आपल्या कादंबरीतून चोरली गेली असल्याचा आरोप केला होता. याबाबत त्यांनीं कोर्टात धाव घेऊन, मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आता या चित्रपटाबाबत नवीन याचिका दाखल करण्यात आली आहे. पानिपत चित्रपट प्रदर्शित होऊ नये म्हणून, सरदार महादजी शिंदे यांच्या परिवारातील, उत्तमराव शिंदे सरकार (Uttamrao Shinde Sarkar) यांनी पुण्याच्या न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे.
पानिपतचा इतिहास हा फक्त पेशवाईशी निगडीत नव्हता, त्यामुळे या लढाईमध्ये सामील झालेल्या अनेक सरदारांशिवाय तो पूर्ण होऊ शकत नाही. मात्र पानिपत या चित्रपटाद्वारे चुकीचा व दिशाभूल करणारा इतिहास दाखवला जात आहे असे शिंदे यांचे म्हणणे आहे. त्यांचे वकील अश्विन मिसाळ यांनी याबद्दल माहिती दिली. या चित्रपटाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर 2 डिसेंबर रोजी पुण्याच्या जिल्हा दिवाणी न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. शिंदे यांनी आपल्या दुसऱ्या वकिलामार्फत चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, कलाकार, लेखक यांनाही कायदेशीर नोटीस पाठवली आहे. (हेही वाचा: पानिपत चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; विश्वास पाटील यांचा आपली कथा चोरल्याचा आरोप, ठोकला 7 कोटींचा दावा)
चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये कुठेही सरदारांचा उल्लेख नाही. फक्त गल्ला भरण्यासाठी सदाशिवरावभाऊ यांची खोटी आणि उथळ प्रतिमा जनतेसमोर मांडण्यात येत आहे. मराठ्यांचा मूळ इतिहास झाकण्याचा हा प्रयत्न आहे असा आरोप शिंदे यांनी केला आहे. महत्वाचे म्हणजे ज्योतिरादित्य शिंदे यांचे बंधू इंद्रजीत शिंदे, मस्तानीचे आठवे वंशज नवाब शादाब ली, तसेच देशभरातील इतर सरदार घराण्यांनीही शिंदे यांच्या आरोपांना पाठींबा दिला आहे.