Uorfi Javed's Reply to Chitra Wagh: 'जोपर्यंत माझे Private Parts दिसत नाहीत तोपर्यंत मला तुरुंगात टाकता येणार नाही'; उर्फी जावेदचे चित्रा वाघ यांच्या तक्रारीला उत्तर
त्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना लिहिलेल्या पत्राची कॉफी शेअर केली आहे.
अभिनेत्री उर्फी जावेद (Uorfi Javed) तिच्या हॉट आणि बोल्ड लूकमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. ती अनेकदा मुंबईच्या रस्त्यांवर तिच्या नव-नवीन ड्रेसमध्ये फोटोग्राफर्सना पोज देताना दिसली आहे. मात्र आता भाजप महाराष्ट्र महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा किशोर वाघ (Chitra Wagh) यांनी रविवारी अभिनेत्री आणि मॉडेल उर्फी जावेद विरोधात तक्रार दाखल केली असून, तिच्यावर तातडीने कारवाई करण्याची विनंती केली आहे. या तक्रारीनंतर उर्फीने चित्रा वाघ यांना जोरदार प्रत्तुत्तर दिले आहे.
मॉडेलविरोधात तक्रार केल्याची माहिती महाराष्ट्र महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा किशोर वाघ यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर दिली. त्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना लिहिलेल्या पत्राची कॉफी शेअर केली आहे. ज्यामध्ये लिहिले आहे की, ‘सार्वजनिक ठिकाणी उर्फी जावेदचे शरीर प्रदर्शन समाजात चर्चेचा विषय बनले आहे. मुंबईतील सार्वजनिक ठिकाणी रस्त्यांवर महिलांच्या अवयवांचे असे प्रदर्शन भारतीय संस्कृती आणि सभ्यतेला कलंकित करते. ती तिच्या वैयक्तिक आयुष्यात काय करते याच्याशी आमचा काहीही संबंध नाही, पण लोकप्रियता मिळवण्यासाठी अभिनेत्री तिच्या शरीराचे अवयव दाखवते. तिला तिचे शरीर दाखवायचे असेल तर घराच्या चार भिंतीत जे काही करायचे असेल करा. परंतु समाजाचे मानसिक विकृतीकरण करण्याचा प्रयत्न करू नये. मी तुम्हाला (मुंबई पोलिसांना) तिच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याची विनंती करते.’
आता उर्फीला तिच्या विरुद्धच्या तक्रारीची माहिती मिळाल्यानंतर, तिने वाघ यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. तिने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले- ‘मला कोणताही खटला नको आहे, जर तुम्ही तुमची आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांची मालमत्ता उघड केलीत तर, मी तुरुंगात जाण्यासाठी तयार आहे. याशिवाय तुमच्या पक्षातील अनेक नेत्यांवर वेळोवेळी छेडछाडीचे आरोप झाले आहेत, त्या महिलांसाठी चित्रा वाघ तुम्ही कधीच काही बोलला नाही.’ (हेही वाचा: ‘पठाण’ चित्रपटातील वादग्रस्त भाग हटवण्याच्या सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी दिल्या सूचना, जाणून घ्या सविस्तर माहिती)
उर्फी जावेदने दुसर्या स्टोरीमध्ये लिहिले- ‘हे राजकारणी आणि वकील वेडे आहेत का? घटनेत असा कोणताही कायदा नाही, ज्याद्वारे मला तुरुंगात पाठवाल. अश्लीलतेची व्याख्या व्यक्तीपरत्वे बदलते. जोपर्यंत माझे प्रायव्हेट पार्ट दिसत नाहीत तोपर्यंत तुम्ही मला तुरुंगात पाठवू शकत नाही. मीडियाचे लक्ष वेधण्यासाठी हे राजकारणी लोक असे करतात. चित्रा वाघ माझ्याकडे तुमच्यासाठी कामाच्या चांगल्या कल्पना आहेत. मुंबईतील मानवी तस्करी, बेकायदेशीर डान्सबार, बेकायदेशीर वेश्याव्यवसाय याबाबत काही तरी करा.’