नाना पाटेकर यांना मुंबई पोलिसांनी दिलेल्या क्लीन चिटला तनुश्री दत्ताने केला विरोध
अभिनेते नाना पाटेकर यांच्या विरोधात विनयभंगाच्या तक्रारीप्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या ‘बी समरी’ अहवालाला विरोध दर्शवित बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने गुरुवारी अंधेरी कोर्टात याचिका दाखल केली.
अभिनेते नाना पाटेकर यांच्या विरोधात विनयभंगाच्या तक्रारीप्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या ‘बी समरी’ अहवालाला विरोध दर्शवित बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने गुरुवारी अंधेरी कोर्टात याचिका दाखल केली. जेव्हा आरोपपत्र दाखल करण्यासाठी पोलिसांना कोणताही पुरावा सापडत नाही तेव्हा “बी-सारांश” अहवाल न्यायालयात सादर केला जातो. तनुश्रीचे वकील नितीन सातपुते यांनी अंधेरी येथील महानगर दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात ही निषेध याचिका दाखल केली आहे.
'खोटा' अहवाल दाखल केल्याबद्दल तपास अधिकाऱ्याविरुद्ध कोर्टाने अवमान कार्यवाही सुरू करावी, तसेच त्याच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी याचिकेत केली आहे. त्याचसोबत सर्व आरोपी आणि तपास अधिकाऱ्यांच्या नार्को-विश्लेषणाची मागणी केली. तनुश्री हिने पुढे कोर्टाला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे तपास सोपवावा अशी विनंती केली.
दरम्यान नाना पाटेकर यांच्यावर खटला दाखल करण्यासाठी कोणतेही पुरावे सापडले नसल्याची माहिती पोलिसांनी जुलै महिन्यात कोर्टाला दिली. तर तनुश्री हिने ऑक्टोबर 2018 मध्ये नाना यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. 2008 मध्ये Horn Ok Pleasss या चित्रपटाच्या सेटवर गाण्याचे चित्रीकरण करत असताना नाना यांनी तिच्यावर अत्याचार केल्याची आणि तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप तनुश्रीने केला होता. तिच्या तक्रारीच्या आधारे नाना पाटेकर, गणेश आचार्य, चित्रपटाचा निर्माता समी सिद्दीकी आणि दिग्दर्शक राकेश सारंग यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.