#MeToo सोना मोहपात्राने लिहिले स्मृती इराणींना 'ओपन लेटर', अनू मलिक वादात हस्तक्षेप करण्याची केली विनंती

गायिका सोना महापात्राने महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांना 'ओपन लेटर' लिहून अनू मलिकच्या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.

(Photo Credit - Twitter)

गायिका सोना मोहपात्राने (Sona Mohapatra) महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांना 'ओपन लेटर' लिहून अनू मलिक यांच्या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. दरम्यान, मंगळवारी स्मृती इराणी यांनी लैंगिक गुन्हेगारांचा डेटाबेस तयार करण्यास सुरूवात केली असल्याचे सांगितले होते. त्यानंतर सोनाने स्मृती इराणी यांचे आभार मानले आहेत. सोनाने इराणींना एक ओपन लेटर पाठवलं आहे. हे लेटर तिने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केले आहे. (हेही वाचा - #MeToo मध्ये फसलेल्या अनु मलिक यांची इंडियन आयडॉल शो मधून एक्झिट: रिपोर्ट्स)

यात तिने म्हटलं आहे की, लैंगिक गुन्हेगारांचा डेटाबेस तयार करण्याच्या पुढाकाराबद्दल तुमचे खूप-खूप आभार. मात्र लैंगिक गुन्हेगारांच्या आरोपांनंतरही काही लोकांना काम देणाऱ्या संस्थांचे काय? त्यापैकी सोनी टीव्हीदेखील एक आहे. ज्यांनी बऱ्याच महिलांच्या आरोपाकडे दुर्लक्ष करत अनू मलिक यांना कामावर घेतले आणि राष्ट्रीय टीव्हीवर 'इंडियन आयडॉल' साठी त्यांना परीक्षक म्हणून नेमले. लैंगिक शोषण झालेल्या महिलांचे काय? पूर्वीपासून सुरू असलेल्या व्यवस्थेत बदल व्हायला हवा. अनू मलिकसारख्या गुन्हेगारांना मंच उपलब्ध करून दिला जात आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक बळकटी मिळत आहे. तसेच संपूर्ण देशात चुकीचा संदेश जात आहे.

सोना महापात्रा यांचे ट्विट - 

दरम्यान, अनु मलिक यांनी 'इंडियन आयडॉल' या शोमधून एक्झिट घेतली आहे. या शोमध्ये अनु मलिक परिक्षक म्हणून आतापर्यंत काम करत होते. अनु मलिक यांच्यावर गेल्या काही काळापासून मीटू मोहिमेअंतर्गत आरोप लावण्यात आले होते. त्यामुळे अनु मलिक यांनी हा निर्णय घेतला. मागील वर्षात मीटू अंतर्गत काही महिलांनी अनु मलिक यांच्यावर विनयभंग आणि लैंगिक छळ केल्याचा आरोप लावला होता. या आरोपांमुळेच गेल्या वर्षात सुद्धा अनु मलिक यांना शो सोडावा लागला होता. मात्र, ते पुन्हा या शो मध्ये परिक्षकाचे काम पाहत होते. त्यामुळे सोना मोहपात्राने अनु मलिक विरोधात पुन्हा मोहिम सुरू केली.