संजय लीला भन्साळी यांच्या Gangubai Kathiawadi चित्रपटावर बंदी घालावी; कामाठीपुरा येथील रहिवासांचे आंदोलन, जाणून घ्या कारण

हा शो खरोखरच नेत्रदीपक होता, अशा प्रतिक्रिया समोर आली आहेत

Gangubai Kathiawadi (PC - Instagram)

संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांचा महत्वाकांशी चित्रपट ‘गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi) प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. अशात हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. याआधी गंगुबाई यांच्या मुलीने आरोप केला होता की, चित्रपटात ‘गंगूबाई काठियावाडी’ यांची चुकीची प्रतिमा दाखवण्यात आली आहे. आता कामाठीपुरा (Kamathipura) या परिसराचे 'लज्जास्पद' चित्रण दर्शवल्याच्या विरोधात कामाठीपुरा येथील लोकांनी आंदोलन सुरु केले आहे. चित्रपटाच्या विरोधात स्थानिक नागरिकांनी पोस्टर घेऊन घोषणाबाजी केली.

'गंगूबाई काठियावाडी', हा चित्रपट दिग्गज चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शित केला आहे. एक तरुणी वेश्याव्यवसायात ढकलली जाते व त्यानंतर ती अंडरवर्ल्ड आणि कामाठीपुवा रेड-लाइट परिसरातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व कशी बनते यावर हा चित्रपट बेतलेला आहे. आलिया भट्ट या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारत असून, पुरुषप्रधान समाजात महिलांच्या हक्कांसाठी लढा देणाऱ्या महिलेच्या रुपात ती दिसत आहे. हा चित्रपट येत्या 25 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

कामाठीपुरा येथील रहिवासांचे म्हणणे आहे की, या ठिकाणी एकूण 42 गल्ल्या आहेत व त्यामध्ये जवळजवळ 30 हजार लोक राहतात. या ठिकाणी फक्त 3 गल्ल्यांमध्ये सेक्स वर्कर्स राहतात. परंतु चित्रपटामध्ये संपूर्ण परिसराचे लज्जास्पद चित्रण केले आहे, त्यामुळे या चित्रपटावर बंदी घालावी.

याआधी गंगूबाईच्या कुटुंबीयांनी गंगूबाई काठियावाडी या चित्रपटावर नाराजी व्यक्त केली होती. या चित्रपटामुळे गंगूबाईच्या कुटुंबीयांच्या अडचणी वाढल्या आहेत. या चित्रपटामुळे आता त्यांच्या कुटुंबीयांना लोकांच्या प्रश्नांपासून वाचवण्यासाठी वारंवार घर बदलावे लागत आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये गंगूबाईची प्रतिमा ज्या प्रकारे दाखवण्यात आली आहे ते पूर्णपणे चुकीचे आणि निराधार आहे. चित्रपटात एका सामाजिक कार्यकर्त्याचे सेक्स वर्कर म्हणून चित्रण करण्यात आले आहे. चित्रपटात गंगुबाई यांना माफिया डॉन आणि खलनायक बनवले आहे, असे कुटुंबियांच्या वकिलांचे म्हणणे आहे. (हेही वाचा: करीना कपूर चित्रपट सोडून टीव्हीमध्ये करणार पदार्पण? ‘स्पाई बहू’ शो चा प्रोमो रिलीज करत मेकर्सने सांगितलं सत्य)

दरम्यान, नुकतेच संजय लीला भन्साळी आणि आलिया भट्ट आपल्या चित्रपटासह 16 फेब्रुवारी 2022 रोजी प्रतिष्ठित 72 व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी झाले होते. हा शो खरोखरच नेत्रदीपक होता, अशा प्रतिक्रिया समोर आली आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर समीक्षक आणि प्रेक्षकांकडून प्रशंसा आणि कौतुक होत आहे.