सुशांत सिंह राजपूत याच्या चाहत्यांच्या भावना समजून घ्या; सलमान खान याचे आपल्या फॅन्सना आवाहन (View Tweet)

त्यामुळे सलमान खान, करण जोहर यांच्यावर सोशल मीडियाद्वारे टीका होत आहे. दरम्यान सुशांत सिंह राजपूत याच्या चाहत्यांच्या भावना समजून घेण्याचे आवाहन सलमान खान याने आपल्या फॅन्सना केले आहे.

Salman Khan, Sushant Singh Rajput (Photo Credits: Instagram)

सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या निधनाने बॉलिवूड सेलिब्रेटींसह चाहत्यांनाही जबर धक्का बसला आहे. सुशांतच्या आत्महत्येमुळे पुन्हा एकदा नेपोटिझमचा मुद्दा वर आला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर चाहते सातत्याने करण जोहर, सलमान खान (Salman Khan) यांसारख्या सेलिब्रेटींवर निशाणा साधत आहेत. अशा कठीण काळात सलमान खान याने आपल्या फॅन्सना सुशांत सिंह राजपूत याच्या चाहत्यांच्या भावना समजून घेण्याचे आवाहन केले आहे. यासाठी सलमान खान याने खास ट्विट केले आहे.

या ट्विटमध्ये सलमानने लिहिले, "मी माझ्या तमाम चाहत्यांना आवाहन करतो की सध्याच्या काळात सुशांतच्या फॅन्सच्या भावना समजून घ्या आणि त्यांना साथ द्या. त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारची चुकीची भाषा वापरु नका. कृपया सुशांतच्या कुटुंबाला आणि चाहत्यांना साथ द्या. आपल्या व्यक्तीला गमावणे खूप वेदनादायी असते." (सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी करण जोहर, सलमान खान, संजय लीला भन्साळी, एकता कपूर यांच्यासमवेत 8 जणांविरोधात मुजफ्फरपूर कोर्टात तक्रार दाखल)

Salman Khan Tweet:

सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर काही लोकांनी वांद्रे येथील Being Human स्टोरबाहेर निदर्शनं केली होती. तसंच स्टोरच्या बॅनरवरुन सलमान खानचा फोटो हटवण्याची मागणीही केली होती.

दरम्यान दबंग सिनेमाचे दिगदर्शक अभिनव कश्यप यांनी देखील सुशांतच्या आत्महत्येनंतर सलमान खानवर टीका केली होती. सलमान खान आणि त्याच्या कुटुंबियांनी आपले करिअर खराब केल्याचे फेसबुक पोस्टद्वारे अभिनव कश्यप यांनी सांगितले होते. तसंच सलमानची चॅरिटी म्हणजे मनी-लॉन्ड्रिंग असल्याचेही त्यांनी म्हटले होते. दरम्यान सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी करण जोहर, सलमान खान, संजय लीला भन्साळी, एकता कपूर यांच्यासमवेत 8 जणांविरोधात मुजफ्फरपूर कोर्टात तक्रार दाखल करण्यात आली आहे.