Body Shaming वर Salman Khan ने ट्रोलर्सना सुनावले, नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव; Katrina Kaif ला अप्रत्यक्ष पाठिंबा?
बिग बॉस 20 च्या वीकेंड का वार भागात सलमान खानने बॉडी शेमिंग आणि एज शेमिंगवर परखड भाष्य केले असून, त्याच्या या वक्तव्याचे नेटकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. अनेकांच्या मते, सलमानने अप्रत्यक्षपणे कतरिना कैफला पाठिंबा दिला आहे.
बिग बॉस 20 च्या 'वीकेंड का वार' या भागात सलमान खानने ट्रोलिंग, एज शेमिंग आणि बॉडी शेमिंग या विषयांवर स्पष्ट आणि परखड मत मांडले. त्याच्या या वक्तव्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, नेटकऱ्यांनी त्याचे भरभरून कौतुक केले आहे.
स्पर्धकांशी बोलताना सलमान म्हणाला, "प्रत्येक शोमध्ये आता हे झालंय की, अचानक 'तो म्हातारा झालाय' असं म्हटलं जातं. तुम्हाला काय ट्रोल करायचंय? त्याच्या वजनावर, त्याच्या लूक्सवर, त्याच्या खानदानावर, कुणाच्या स्माईलवर, कुणाच्या फ्लॉपवर, कुणाच्या आई बनण्यावर, तुम्ही तुमचं संगोपन दाखवत आहात." स्वतःलाही वयामुळे ट्रोल केले जात असल्याचे सांगत सलमानने आपला अनुभवही शेअर केला.
कतरिना कैफसाठी घेतली बाजू?
सलमानच्या या वक्तव्याने अनेकांना असे वाटले की तो अप्रत्यक्षपणे आपली मैत्रीण आणि सहकलाकार कतरिना कैफची बाजू घेत आहे. काही दिवसांपूर्वीच कतरिना पती विकी कौशलसोबत अंबानी कुटुंबाच्या गणपती उत्सवात सहभागी झाली होती, त्यावेळी तिच्या प्रसूतीनंतरच्या वाढलेल्या वजनावरून सोशल मीडियावर तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते.
सलमानने आपल्या वक्तव्यात कतरिनाचे नाव घेतले नसले, तरी "प्रेग्नंट झाल्यानंतर प्रत्येकाचे वजन वाढते" असे म्हणत महिलांना प्रसूतीनंतर लगेच पूर्वीच्या शरीरयष्टीत परतण्याची अपेक्षा का ठेवली जाते, असा सवाल त्याने उपस्थित केला.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
सलमानच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटल्या. एका युजरने एक्सवर लिहिले, "मला माहित आहे सलमान खान इथे कतरिना कैफची बाजू घेत आहे, पण मी ते सिद्ध करू शकत नाही. सलमान असाच असतो, म्हणूनच बिग बॉस खास आहे." दुसऱ्या एका युजरने लिहिले, "सलमान खानने लूक्स, प्रोफेशन, वजन, वयावरून ट्रोल केल्या जाणाऱ्या सर्वांची बाजू घेतली."
स्टेजवरच काढला जॅकेट आणि टोपी
आपले मुद्दे अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी सलमानने स्टेजवरच आपली कॉबॉय हॅट, जॅकेट आणि टी-शर्ट काढत मेकअपही पुसला. "भाई मोटा हो गया है!" असे म्हणत त्याने स्वतःवरील ट्रोलिंगचाही समाचार घेतला.
हृतिक रोशनचाही पाठिंबा
कतरिनावरील ट्रोलिंगनंतर तिला चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनीही पाठिंबा दिला होता. हृतिक रोशनने तिची बाजू घेणाऱ्या एका पोस्टला लाईक केल्याचेही यापूर्वी समोर आले होते.
सलमानच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावरील ट्रोलिंग संस्कृतीबाबत एक व्यापक चर्चा सुरू झाली असून, इतरांना ट्रोल करण्यापूर्वी स्वतःच्या असुरक्षिततेचा विचार करा, असा सल्लाही सलमानने दिला आहे.