महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागातील लोकांसाठी गायक मीका सिंह याची 5 लाखाची मदत; 50 लोकांना बांधून देणार घरे

मीका सिंहने पूरग्रस्त भागातील लोकांना घरे बांधून देण्यासाठी 5 लाख रुपयांची मदत केली आहे.

Mika Singh. (Photo Credits: Twitter)

सांगली, कोल्हापूर येथील पूर (Flood) परिस्थिती आता निवळत आहे. पुनर्वसन कार्य जोरदार चालू आहे, मदतीचा ओघ सुरु आहे. राज्यातील महत्वाच्या पक्षांनी, सामाजिक संस्था, नागरिक, देवस्थाने यांनी पूरग्रस्त नागरिकांसाठी मदत जाहीर केली आहे. बॉलिवूडमधून मदतीसाठी जे हात पुढे आले आहेत त्यामध्ये आता गायक मीका सिंह (Mika Singh) याची भर पडली आहे. मीका सिंहने पूरग्रस्त भागातील लोकांना घरे बांधून देण्यासाठी 5 लाख रुपयांची मदत केली आहे.

मीका सिंह याचे ट्विट -

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद (Akhil Bharatiya Marathi Natya Parishad) कडे मीकाने ही रक्कम सुपूर्त केली आहे. मीका सिंह Divine Touch Foundation नावाने एक सामाजिक संस्था चालवतो. या संस्थेमार्फत ही मदत केली गेली आहे, सोबतच मीका सिंह 50 पूरग्रस्त लोकांना घरेही बांधून देणार आहे. आपण केलेल्या मदतीसोबतच इतरांनीही मदतीचा हात पुढे करावा असे आवाहन मीका सिंहने केले आहे. (हेही वाचा: गायक मीका सिंह याच्यासह 14 जणांवर FWICE कडून बंदी; पाकिस्तानमध्ये परफॉर्मन्स दिल्याने कारवाई)

पाकिस्तानमध्ये मुशर्रफ यांच्या नातेवाईकाच्या लग्नात परफॉर्म केल्याने मीका सिंह अडचणीत आला आहे. त्याच्या या कृत्याचा निषेध म्हणून भारतामध्ये काम करण्यासाठी त्याच्यावर बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, सिनेसृष्टीमधील अनेक लोकांना महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत जाहीर केली आहे. यामध्ये अमिताभ बच्चन, उर्मिला मातोंडकर, नाना पाटेकर, सुबोध भावे अशा काही दिग्गजांचा समावेश होतो. महाराष्ट्र सरकारही पूरग्रस्तांना पूर्णतः नष्ट झालेली घरे बांधून देण्यासाठी मदत करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.