Mumbai: टीव्ही आणि चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीवर बलात्कार; कास्टिंग डायरेक्टरविरुद्ध गुन्हा दाखल, तपास सुरु
याआधी अनेकवेळा अभिनेत्रींनी इंडस्ट्रीमधील लोकांवर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. आता एका टेलीव्हिजन अभिनेत्रीने कास्टिंग दिग्दर्शकावर (Casting Director) बलात्काराचा (Rape) आरोप केला आहे.
मी टू (Me Too) प्रकरण असो वा ड्रग्ज केस सध्या अनेक बाबींमुळे बॉलिवूडची प्रतिमा डागाळली गेली आहे. याआधी अनेकवेळा अभिनेत्रींनी इंडस्ट्रीमधील लोकांवर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. आता एका टेलीव्हिजन अभिनेत्रीने कास्टिंग दिग्दर्शकावर (Casting Director) बलात्काराचा (Rape) आरोप केला आहे. या अभिनेत्रीने दिलेल्या स्टेटमेंटच्या आधारे वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये कलम 376 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयुष तिवारी (Ayush Tiwari) असे या कास्टिंग डिरेक्टरचे नाव आहे. या अभिनेत्रीने 26 नोव्हेंबर रोजी तक्रार दाखल केली होती.
मुंबईत टीव्ही आणि चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या रायपूरची रहिवासी असलेल्या या 28 वर्षीय अभिनेत्रीने तिचा प्रियकर आयुषवर बलात्काराचा आरोप केला आहे. बलात्कार पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार आयुष तिवारीने टीव्ही आणि चित्रपटांमध्ये काम देण्याच्या तसेच लग्नाचे आमिष दाखवून तिला प्रेमाच्या जाळ्यात फसवले. त्यानंतर तिच्यावर अनेकवेळा आणि वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार केला. या महिलेच्या म्हणण्यानुसार ती 26 नोव्हेंबर रोजी आयुषच्या रूममेट राकेश शर्मा याच्याकडे याबाबत तक्रार करण्यासाठी गेली होती, तेव्हा राकेश आणि आयुष यांनी तिला बंदी बनवून ठेवले आणि तिच्यावर बलात्कार केला. (हेही वाचा: Mumbai Rape: ऑनलाईन कामाचे आमिष दाखवून इंजिनियर मुलीवर बलात्कार; आरोपीला अटक)
आता राकेश आणि आयुष यांच्यासह मुंबई पोलिस तिच्यावर तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणत असल्याचा आरोप या महिलेने केला आहे. तक्रार मागे न घेतल्यास सोशल मीडियावर तिचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली जात आहे. या संदर्भात मुलीने मुंबई पोलिसांसह महाराष्ट्र गृहमंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालयात तक्रार नोंदवल्याची माहिती दिली आहे. वर्सोवा पोलिस स्टेशनच्या पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीने तक्रार केली आहे की, लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने अभिनेत्रीवर दोन वर्षे बलात्कार केला. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.