Kangana Ranaut ला कायदेशीर नोटीस; शेतकरी आंदोलनातील आजींबाबत फेक ट्वीट केल्याने वाढल्या अडचणी

परंतु बर्‍याच वेळा तिच्या ट्वीटवरून वादही निर्माण होतात.

Kangana Ranaut (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) ट्विटरवर खूपच सक्रिय आहे आणि या ठिकाणी ती अगदी बिनधास्तपणे आपले विचार मांडत असते. परंतु बर्‍याच वेळा तिच्या ट्वीटवरून वादही निर्माण होतात. आताही कंगना तिच्या एका वादग्रस्त ट्विटमुळे कायदेशीर अडचणीत सापडली आहे. कंगना राणौतने कृषी कायद्याविरोधातील शेतकरी चळवळीबद्दल ट्विट केले होते, ज्यात तिने एक महिला आंदोलक ही शाहीनबागची 'आजी' बिलकिस बानो असल्याचे सांगितले होते. आता यासंदर्भात पंजाबच्या वकिलाने कंगना रनौतला कायदेशीर नोटीस बजावली आहे आणि त्या ट्विटबद्दल माफी मागण्याची मागणी केली आहे.

कंगनाने एका ट्विटला रिट्विट करत लिहिले होते की, 'हाहाहा ... ही तीच आजी आहे जिला टाइम मासिकाच्या भारतातील सर्वात सामर्थ्यवान लोकांमध्ये समाविष्ट केले गेले होते. ही आजी 100 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. पाकिस्तानच्या पत्रकारांनी भारतासाठी लाजिरवाणेपणे आंतरराष्ट्रीय पीआर हायर केले आहे. आम्हाला असे लोक हवे आहेत जे आंतरराष्ट्रीय स्तरावर आमच्यासाठी आवाज उठवू शकतील.’ आता वकील हाकम सिंह म्हणाले की, मोहिंदर कौरला (Mohinder Kaur) बिलकिस बानो असल्याचे सांगणाऱ्या ट्विटबाबत कंगना रनौतला कायदेशीर नोटीस पाठविली आहे.

कंगना राणौतने सात दिवसात माफी मागावी नाहीतर मानहानीचा खटला दाखल केला जाईल, असेही वकिलाने सांगितले आहे. ‘बिलकीस दादी' ही दिल्लीतील शाहीन बागेत सीएएच्या निषेधात सहभागी झालेली एक अग्रणी महिला होती. (हेही वाचा: Showik Chakraborty चा जामीन Special NDPS Court कडून मंजूर; 2 महिन्यांनंतर सुटका)

दरम्यान, कंगना रनौतने शेतकरी चळवळीशी संबंधी ज्या आजींची चेष्टा केली होती, त्यांची प्रतिक्रिया आता सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत भठिंडाच्या 80 वर्षीय आजी मोहिंदर कौर म्हणाल्या, 'कंगनाला काय माहिती शेती म्हणजे काय आहे? ती वेडी आहे. ती जे काही म्हणाली ते फार  चुकीचे होते. कंगनाला काय माहिती शेतकऱ्याची कमाई काय आहे? जेव्हा घाम वाहतो, रक्त गरम होते तेव्हा कुठे पैसा येतो. ती कधी मला भेटली नाही, मी काय करते ते तिला माहिती नाही, अशा परिस्थितीमध्ये मी 100 रुपयांमध्ये उपलब्ध आहे असे म्हणणे चुकीचे आहे.’