Kareena Kapoor वर होत आहे ती बेजबाबदार, निष्काळजी असल्याचा आरोप; अभिनेत्रीने दिले 'हे' स्पष्टीकरण- 'पार्टीमध्ये एक सदस्य होता...'
8 डिसेंबरला गेट टुगेदरसाठी ती करण जोहरच्या घरी गेली होती. या व्यतिरिक्त करिश्मा कपूर, मलायका अरोरा, मसाबा गुप्ता देखील या पार्टीत उपस्थित होत्या
करीना कपूर (Kareena Kapoor) आणि अमृता अरोरा (Amrita Arora) कोरोना विषाणू (Coronavirus) पॉझिटिव्ह आल्यानंतर बीएमसीने त्यांची संपूर्ण इमारत सील केली आहे. बीएमसीचे एक पथक त्यांच्या आजूबाजूच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या सर्व लोकांची चाचणी घेत आहे. मंगळवारी दुपारी 12 वाजेपर्यंत 20 हून अधिक लोकांचे नमुने घेण्यात आले होते. या सर्वांची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली आहे. अशात करीना कपूरवर ती बेजबाबदार, निष्काळजी असल्याचा आरोप होत आहे. त्यानंतर तिच्या प्रवक्त्याने एक निवेदन जारी करत पार्टीमध्ये एक सदस्य आजारी असल्याचे सांगितले आहे.
करीना कपूर टीमकडून जारी केलेल्या निवेदनामध्ये, करण जोहरच्या पार्टीत सहभागी झालेल्या एका सदस्यावर कोरोना संसर्ग पसरल्याचा आरोप केला आहे. रिपोर्ट्सनुसार, सोहेल खानची पत्नी आणि डिझायनर सीमा खान ही आजारी होती व ती पार्टीमध्ये खोकत असल्याचे म्हटले आहे. सर्वप्रथम सीमाचीच कोविड चाचणी करण्यात आली. करीनाच्या प्रवक्त्याने सांगितले की, ‘करिना संपूर्ण लॉकडाऊनमध्ये तिची जबाबदारी योग्य रीतीने पार पाडत आहे. प्रत्येक वेळी बाहेर पडताना ती सावधगिरी बाळगत होती.’
यामध्ये पुढे म्हटले आहे, ‘दुर्दैवाने, यावेळी तिला आणि अमृता अरोरा यांना एका खाजगी डिनर पार्टीत कोरोना संसर्ग झाला, जिथे फक्त काही खास मित्र आले होते. माध्यमांनी सांगितल्याप्रमाणे ही काही मोठी पार्टी माव्हाती. या पार्टीमध्ये एक सदस्य होता जो आजारी दिसत होता आणि खोकला होता आणि त्यानेच शेवटी सर्वांना संक्रमित केले. या सदस्याने पार्टीमध्ये यायला नको होते.’
‘करीनाच्या चाचणीचा निकाल पॉझिटिव्ह येताच तिने स्वतःला क्वारंटाईन केले आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी ती आवश्यक ती खबरदारी आणि प्रोटोकॉल पाळत आहे. तिला दोष देणे आणि ती बेजबाबदार आहे असे म्हणणे योग्य नाही. करीना एक जबाबदार नागरिक आहे. आणि तिला तिच्या आणि तिच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेचीही काळजी आहे.’ याच पार्टीत सहभागी झालेल्या संजय कपूरची पत्नी महीप कपूर आणि सोहेल खानची पत्नी सीमा खान यांनाही कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे. (हेही वाचा: Kareena Kapoor Khan हिची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने निवासस्थान सील केल्याची BMC ची माहिती)
मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्यांदा सीमा खानला संसर्ग झाल्याची पुष्टी झाली. 8 डिसेंबरला गेट टुगेदरसाठी ती करण जोहरच्या घरी गेली होती. या व्यतिरिक्त करिश्मा कपूर, मलायका अरोरा, मसाबा गुप्ता देखील या पार्टीत उपस्थित होत्या. त्यांचीही आरटी-पीसीआर चाचणी झाली आहे. 'कभी खुशी कभी गम' या चित्रपटाला 20 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त 8 डिसेंबरला करण जोहरच्या घरी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.