सुशांत सिह राजपूत आत्महत्या प्रकरणावर कंगना रनौत हिचे मोठे वक्तव्य- 'माझी विधाने सिद्ध करु न शकल्यास पद्मश्री पुरस्कार परत करेन'
यासाठी तिने एक व्हिडिओ देखील जारी केला होता.
सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या मृत्यूनंतर कंगना रनौत (Kangana Ranaut) हिने बॉलिवूडमधील बड्या कलाकारांच्या नावाचा उल्लेख करत नेपोटिज्मचा (Nepotism) मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित केला होता. यासाठी तिने एक व्हिडिओ देखील जारी केला होता. यात कंगना घराणेशाही, स्टार किड्स या सर्व विषयांवर खुलेपणाने बोलली आहे. कंगनाच्या या व्यक्तव्यांचे अनेकांनी समर्थन केले आहे. दरम्यान, "मी केलेले दावे सिद्ध करु शकले नाही तर पद्मश्री पुरस्कार परत करेन," असे मोठे वक्तव्य कंगनाने आता केले आहे. सध्या कंगना तिच्या मूळ गावी मनाली मध्ये असल्याचे रिपल्बिक मीडियाशी बोलताना तिने सांगितले. तसंच मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) सन्मस जारी करण्यात आला असून प्रश्न उत्तरांसाठी तयार असल्याचेही कंगनाने स्पष्ट केले आहे. (पूजा भट्ट आणि कंगना रनौत यांच्यात नेपोटिज्मवरुन ट्विटरवॉर; सुशांत सिंह राजपूत आणि रिया चक्रवर्ती यांच्या नात्यामध्ये महेश भट्ट यांना इतका रस का? कंगनाचा थेट सवाल)
याबद्दल बोलताना कंगनाने सांगितले, "मुंबई पोलिसांनी मला समन्स पाठवला आहे. परंतु, मी मनालीत असल्याने कोणालातरी पाठवून माझा जबाब नोंदवा असेही मी त्यांना सांगितले. परंतु, त्यांच्या बाजूने अद्याप उत्तर आलेले नाही. मी असे काही केले किंवा बोलले असेन की जे मी सिद्ध करु शकत नाही तर मी माझा पद्मश्री पुरस्कार परत करेन. कोणत्याही कारणाशिवाय ऑन रेकॉर्ड बोलणाऱ्यातली मी नाही, "असेही तिने स्पष्ट केले. दरम्यान मी बोललेल्या गोष्टी अस्तित्वातच नाही, तसे असेल तर सांगा, असेही ती म्हणाली.
कंगना रनौत हिला आतापर्यंत 3 राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. याशिवाय पद्मश्री पुरस्कारानेही तिला सन्मानित करण्यात आले आहे. दरम्यान सुशांत सिह राजपूत याच्या आत्महत्येनंतर करण जोहर, आदित्य चोप्रा आणि महेश भट्ट यांचे नाव घेऊन यांच्यावर नेपोटिज्मसह गटबाजीचा आरोप केला होता.