बहिण रंगोली चंदेलच्या ट्विट प्रकरणावर भडकली कंगना रनौत; 'ट्विटरला हाकलून भारताने सुरु केले पाहिजे स्वतःचे सोशल मिडिया व्यासपीठ'
दोन दिवसांपूर्वी अभिनेत्री कंगना रनौतची (Kangana Ranaut) बहिण रंगोली चंदेल (Rangoli Chandel) हिने, मुरादाबाद (Moradabad) मध्ये झालेल्या आरोग्य सेवा कर्मचार्यांवरील हल्ल्याबाबत द्वेषयुक्त ट्विट केले होते
दोन दिवसांपूर्वी अभिनेत्री कंगना रनौतची (Kangana Ranaut) बहिण रंगोली चंदेल (Rangoli Chandel) हिने, मुरादाबाद (Moradabad) मध्ये झालेल्या आरोग्य सेवा कर्मचार्यांवरील हल्ल्याबाबत द्वेषयुक्त ट्विट केले होते. त्यानंतर रंगोलीचे ट्विटरने अकाऊंट निलंबित करण्यात आले. रंगोलीने केलेल्या ट्विटबाबत बराच वादंग माजला होता. आता कंगना रनौत आपल्या बहिणीच्या समर्थनार्थ मैदानात उतरली आहे. आपल्या बहिणीच्या ट्विटचा चुकीचा अर्थ काढण्यात आला, तिने मुस्लीम लोकांबद्दल कोणतेही विधान केले नाही. तसे आढळल्यास आपण दोघीही जाहीर माफी मागू असे कंगनाने सांगितले आहे. कंगनाने याबाबचा एक व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.
मुरादाबादमध्ये झालेल्या घटनेबद्दल प्रतिक्रिया देताना, रंगोलीने वादग्रस्त ट्विट केले होते. ती म्हणाली होती, ‘कोरोना व्हायरसमुळे जमातीमधील एकाचा मृत्यू झाला. त्यानंतर डॉक्टर, परिचारिका व वैद्यकीय पथक त्यांच्या कुटूंबाची तपासणी करण्यासाठी गेले असता, त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आणि दगडफेक करण्यात आली. सर्व मुल्लांना एका ओळीत उभे केले पाहिजे आणि गोळ्या घालून ठार केले गेले पाहिजे. भविष्यात एखाद्याने आपल्याला 'नाझी' म्हणून संबोधले तरी याची पर्वा नाही. अशा खोट्या दिखाव्यापेक्षा आयुष्य महत्त्वाचे आहे.’ त्यानंतर फराह खान आली, रीमा कागती यांनी रंगोलीवर टीका केली होती.
कंगना रनौत व्हिडिओ -
आता कंगना आपल्या बहिणीच्या मागे उभी आहे. ती व्हिडिओमध्ये म्हणते, ‘रंगोलीच्या ट्विटचा चुकीचा अर्थ लावण्यात आला. प्रत्येक मुस्लीम दहशतवादी आहे असे आम्हाला म्हणायचे नाही. तसेच प्रत्येक मुस्लीम वाईट आहे असेही आम्हाला म्हणायचे नाही. ट्विटरसारखी बाहेरची व्यासपीठे भारतात करोडो रुपये कामावतात व इथेच भांडणे लावतात. पंतप्रधान, गृहमंत्री यांना दहशतवादी म्हटलेले चालले मात्र जे खरे दहशतवादी आहेत त्यांना त्या नावाने संबोधलेले चालत नाही. तर अशा व्यासपीठांना भारतात पूर्णतः हाकलवून देऊन त्या जागी भारतीय व्यासपीठे सुरु करावीत.’ (हेही वाचा: कंगना रनौतची बहीण Rangoli Chandel चे ट्विटर अकाऊंट निलंबित; मुरादाबादमध्ये झालेल्या आरोग्य कर्मचार्यांवरील हल्ल्याबाबत दिली द्वेषयुक्त प्रतिक्रिया)
दरम्यान, रंगोली चंदेलविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. अली कासिफ खान नावाच्या वकिलाने मुंबईच्या आंबोली पोलिस ठाण्यात लेखी तक्रार केली आहे. रंगोली सोशल मीडियाच्या माध्यमातून विशिष्ट समाजातील लोकांना लक्ष्य करीत असल्याचा आरोप खान यांनी केला आहे.