Irrfan Khan’s Demise: आईच्या आठवणीत इरफान खान यांनी घेतला शेवटचा श्वास; 'अम्मा मला घेऊन जाण्यासाठी आली आहे', हे होते शेवटचे शब्द
यावेळी ते 53 वर्षांचे होते. एका दुर्मिळ कर्करोगाच्या आजाराशी ते झगडत होते
भारतीय चित्रपटसृष्टीमधील सर्वोत्कृष्ट कलाकारांपैकी एक म्हणून ओळखला गेलेला बॉलिवूड अभिनेता, इरफान खान (Irrfan Khan) यांचे आज, 29 एप्रिल 2020 रोजी निधन झाले. यावेळी ते 53 वर्षांचे होते. एका दुर्मिळ कर्करोगाच्या आजाराशी ते झगड होते. अशात काल, 28 एप्रिल रोजी त्यांना मुंबईच्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जेव्हापासून त्यांच्या निधनाची बातमी ऑनलाईन बाहेर आली, तेव्हापासून चाहत्यांनी तसेच सेलेब्रिटींनी त्यांच्या जाण्याबद्दल शोक व्यक्त केला आहे. इरफान खान यांचे जाणे हे मनोरंजन उद्योगाचे मोठे नुकसान आहे असेही अनेकजण म्हणाले आहेत.
इरफान यांची अभिनय प्रतिभा अतुलनीय होती, अभिनयाच्या बाबतीत तर त्यांची जागा दुसरे कोणीच घेऊ शकणार नाही. अशात इरफान खान यांनी जगाला निरोप देण्यापूर्वी उच्चारलेले शेवटचे शब्द हे अतिशय भावनाप्रधान होते. बॉम्बे टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे. इरफान यांना शेवटच्या क्षणी आपल्या दिवंगत आईची आठवण झाली होती. शनिवारी इरफानची आई सईदा बेगम यांनी वयाच्या 95 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. (हेही वाचा: A Quiet Farewell: अभिनेता इरफान खान यांना अखेरचा निरोप; मुले बबील खान आणि अयान खान यांनी केले अंत्यंसंस्कार)
‘अम्मा मला घेऊन जायला आली आहे,’ हे इरफान यांचे मरण्यापूर्वीचे शेवटचे शब्द होते. या शब्दांवरून लक्षात येते की, जणू काही इरफान यांना आपण जाणार हे आधीच माहित होते. इरफान जरी कर्करोगाने त्रस्त असले तरी, आईने जाणे त्यांच्या जिव्हारी लागल्याचे दिसते. दरम्यान, ‘अंग्रेझी मीडियम’ हा इरफान यांचा शेवटचा चित्रपट ठरला. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आपण जास्त वेळ देऊ शकत नसल्याची खाताही त्यांनी व्यक्त केली होती. लॉकडाऊनमुळे हा चित्रपट चित्रपटगृहात फारसा कमाल दाखवू शकला नाही, त्यानंतर तो हॉटस्टारवर प्रदर्शित करण्यात आला.