अभिनेत्री Kangana Ranaut च्या अडचणीमध्ये वाढ; कोर्टाकडून जामीनपात्र वॉरंट जारी, जाणून घ्या सविस्तर
गीतकार अख्तर यांनी आपल्या तक्रारीत दावा केला आहे की, ‘एका वाहिनीला चित्रपट अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूशी संबंधित दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान, रनौतने माझ्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली.
बॉलिवूडची 'क्वीन' कंगना रनौतच्या (Kangana Ranaut) अडचणीमध्ये वाढ होऊ शकते. प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात मुंबई दंडाधिकारी न्यायालयाने अभिनेत्रीविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. कोर्टाने अभिनेत्री कोर्टात हजर राहिली नसल्याबद्दल वॉरंट जारी केले आहे. गेल्या वर्षी जावेद अख्तर यांनी, टीव्ही मुलाखती दरम्यान कंगना राणौतने आपल्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप केला होता. कंगनाच्या या वक्त्यव्यामुळे आपल्या प्रतिमेला धक्का बसला असल्याचेही त्यांनी म्हटले होते. अख्तर यांनी नोव्हेंबर 2020 मध्ये कंगनाच्या विरोधात अंधेरी कोर्टात मानहानीचा दावा दाखल केला होता.
मुंबईच्या अंधेरी येथील दंडाधिकारी न्यायालयात आज या खटल्याची सुनावणी झाली. जावेद अख्तर वेळेआधीच कोर्टात पोहोचले होते आणि त्यांचे वकील वृंदा ग्रोव्हर यांनी कोर्टासमोर अख्तर यांची बाजू मांडली. या सुनावणीसाठी कंगना रनौत आणि तिचा वकील पोहोचले नाही. 1 फेब्रुवारी रोजी झालेल्या सुनावणीत कोर्टाने कंगनाला पुढील सुनावणीला हजर राहण्याचे आदेश दिले होते.
कंगनाच्या वतीने कनिष्ठ वकील यांनी सांगितले की दुपारी कंगनाच्या वतीने त्यांचे वरिष्ठ वकील येतील, ज्यावर त्यांना दंडाधिकारी आर.आर. खान यांच्याकडून ओरडा खावा लागला. सकाळी 11.35 वाजता दंडाधिकारी म्हणाले की जावेद आणि त्यांचे वकील सकाळी 11 वाजल्यापासून थांबले आहेत. यानंतर त्यांनी कंगनाच्या वकिलाला 25 मिनिटांत कोर्टात पोहोचण्यास सांगितले. कोर्टाची सुनावणी 12 वाजता झाली. (हेही वाचा: गीतकार Javed Akhtar यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्याप्रकरणी Kangana Ranaut ला पोलिसांनी बजावला समन्स; 22 जानेवारीला हजर राहण्याचे आदेश)
गीतकार अख्तर यांनी आपल्या तक्रारीत दावा केला आहे की, ‘एका वाहिनीला चित्रपट अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूशी संबंधित दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान, रनौतने माझ्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली. या टिप्पण्यांमुळे मला मानसिक त्रास होत आहे. सुशांत प्रकरणाशी माझा काही संबंध नाही. मात्र तरी कंगनाने माझ्याबद्दल आक्षेपार्ह भाष्य केले आहे. म्हणून, भारतीय दंड संहितेचे कलम 499 आणि 500 अन्वये रनौतवर खटला चालविण्याचे निर्देश दिले जावेत.’ दरम्यान, याआधी कंगनाविरुद्ध दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याबाबत अभिनेत्रीला समन्स बजावला होता मात्र त्यावेळीही ती निवेदन नोंदवण्यासाठी आली नव्हती.