गल्ली बॉय सिनेमाला 'या' कारणासाठी ऑस्कर मिळणार नाही; कमाल खान ची ट्विटर वर भविष्यवाणी
मात्र कितीही झालं तरी यंदा देखील भारताला ऑस्कर मिळवणे शक्य नाही असे म्हणत स्वयंघोषित चित्रपट समीक्षक कमाल रशीद खान याने एक ट्विट केले आहे.
रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि आलिया भट (Alia Bhatt) यांच्या अभिनयाने नटलेला गल्ली बॉय (Gully Boy) या सिनेमाची ऑस्कर (Oscar) वारी निश्चित झाल्याने सर्वांकडूनच सिनेमाच्या टीमवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र कितीही झालं तरी यंदा देखील भारताला ऑस्कर मिळवणे शक्य नाही असे म्हणत स्वयंघोषित चित्रपट समीक्षक कमाल रशीद खान (KRK) याने एक ट्विट केले आहे. वास्तविक वाचाळवीर कमाल याने आपल्या ट्विट मधून गल्ली बॉय या सिनेमाचे कौतुक केले, हा सिनेमा खरोखरच उत्तम आहे असेही म्हंटले, पण त्याला जोडूनच गल्ली बॉय हा अनेक हॉलिवूड सिनेमांची कॉपी करून बनवलेला आहे असा दावा केला, साहजिकच कॉपी असल्यामुळे या सिनेमाला आणि परिणामी भारताला यंदाही ऑस्कर मिळवणे शक्य होणार नाही अशी भविष्यवाणी देखील कमालने केली आहे.
कमाल खान हे नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानांमुळे बॉलिवूड मध्ये चर्चेत असतो, याहीवेळेस त्याने गल्ली बॉय वर निशाणा साधला. याशिवाय आपल्याकडे फिल्म फेअर सारखे नामांकित पुरस्कार असताना आपल्याला ऑस्करची काय गरज? आपण ऑस्कर मिळवण्याचा प्रयत्न तरी का करावा? ” अशा शब्दात कमाल खानने ट्विट मार्फत सवाल केला आहे. साहजिकच या ट्विटनंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी आपल्या शैलीत केआरकेचा खरपूस समाचार देखील घेतला.
KRK ट्विट
दरम्यान, गल्ली बॉय हा यंदाच्या ऑस्कर मध्ये ‘सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फिचर फिल्म’ या पुरस्कारासाठी भारताची अधिकृत एंट्री आहे. झोया अख्तर दिग्दर्शित ‘गली बॉय’ या चित्रपटात झोपडपट्टीत लहानाचा मोठा झालेला आणि आपल्या स्वप्नांसाठी कष्ट घेणाऱ्या २६ वर्षीय ‘डिव्हाइन’ म्हणजे विवियन फर्नांडिस आणि ‘रॅपर नॅझी’ म्हणजेच नावेद शेख या प्रसिद्ध रॅपरची कथा दाखवण्यात आली आहे.