हॉटेलने दोन केळांसाठी आकारले 442 रुपये; राहुल बोसच्या 'त्या' व्हिडीओ नंतर कर विभागाकडून 25 हजारांचा दंड
या आदेशानुसार एक्साइज व टॅक्सेशन डिपार्टमेंटची स्वतंत्र टीम तयार केली गेली. या टीमने जेडब्ल्यू मॅरियट हॉटेल (JW Marriott) ला 25 हज़ार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
मोठ मोठ्या हॉटेलमध्ये खाद्यपदार्थांवर अनेक कर लावून ग्राहकांना लुटले जाते आणि याची आपणास काहीच कल्पना नसते. याचे एक महत्वाचे उदाहरण सध्या घडले आहे, यामुळेच बॉलीवूड अभिनेता राहुल बोस (Rahul Bose) चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी राहुलने एक व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर शेअर केला होता. एका पंचतारांकित हॉटेलने राहुलला अवघ्या दोन केळांसाठी तब्बल 442 रुपये दर आकाराला होता. याच गोष्टीचा व्हिडीओ आणि बिल राहुलने शेअर केले होते. आता या हॉटेलवर या प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे.
चंडीगढ़च्या डेप्युटी कमिशनरनी या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार एक्साइज व टॅक्सेशन डिपार्टमेंटची (Excise and Taxation Department) स्वतंत्र टीम तयार केली गेली. या टीमने जेडब्ल्यू मॅरियट हॉटेल (JW Marriott) ला 25 हज़ार रुपयांचा दंड ठोठावला आहे. हा दंड सीजीएसटी सेक्शन 11 (वस्तूंवर चुकीच्या पद्धतीने आकाराने) चे उल्लंघन केल्याप्रकरणी ठोठावण्यात आला आहे. (हेही वाचा: पंचतारांकित हॉटेलमध्ये ग्राहकांची लुट, दोन केळांचे बिल पाहुन अभिनेता राहुल बोस अवाक)
चंदिगढ येथे एका शूटमध्ये राहुल व्यस्त आहे. आपल्या चंदिगढमधील वास्तव्यादरम्यान राहुल पंचतारांकित हॉटेल जे डब्ल्यू मॅरियट येथे मुक्कामास आहे. एके सकाळी जिम नंतर राहुलने हॉटेलकडे दोन केळांची मागणी केली. केळी पाठवण्यात आली, त्या सोबत बीलदेखील आले. हे बिल पाहून राहुल चक्रावून गेला. कारण हॉटेलने दोन केळांसाठी राहुलला 442 रुपयांचे बिल पाठवले होते. राहुलने ताबडतोप या गोष्टीचा व्हिडीओ बनवून आपली मते व्यक्त केली. काही वेळातच सोशल मिडीयावर हा व्हिडीओ व्हायरल झाला होता.