सलमान खान, अक्षय कुमार, अजय देवगण यांच्यासह एकूण 38 सेलेब्सविरोधात तक्रार दाखल; घडली मोठी चूक, जाणून घ्या काय आहे प्रकरण 

तिस हजारी न्यायालयाचे वकील गुलाटी यांनी शनिवारी ही तक्रार दाखल केली

Ajay Devgn, Salman Khan, Akshay Kumar (संग्रहित संपादित प्रतिमा)

दिल्लीतील वकील गौरव गुलाटी यांनी बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान, अक्षय कुमार आणि अजय देवगण यांच्यासह एकूण 38 सेलेब्सविरोधात दिल्लीच्या सबजी मंडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. तिस हजारी न्यायालयाचे वकील गुलाटी यांनी शनिवारी ही तक्रार दाखल केली. 2019 मध्ये हैदराबाद येथे झालेल्या बलात्कार (Rape) प्रकरणात या स्टार्सनी सोशल मीडियावर पीडितेची ओळख उघड केल्याचा गुलाटी यांचा आरोप आहे. गुलाटी यांनी 4 सप्टेंबर रोजी दिल्लीतील सबजी मंडी पोलीस स्टेशनमध्ये कलम 228 ए अंतर्गत या सर्व सेलेब्सविरोधात लेखी तक्रार दिली होती, त्यानंतर त्यांची तक्रार पोलिसांनी नोंदवून घेतली होती.

ज्या 38 सेलेब्सविरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे त्यात प्रसिद्ध अभिनेते-अभिनेत्री, क्रिकेटपटू, खेळाडू आणि दिग्दर्शक यांचा समावेश आहे. यामध्ये सलमान खान, अक्षय कुमार, अजय देवगण, अभिषेक बच्चन, फरहान अख्तर, अनुपम खेर, अरमान मलिक, मधुर भांडारकर, रवी तेजा, हरभजन सिंग, शिखर धवन, सायना नेहवाल, परिणीता चोप्रा, दिया मिर्झा, स्वरा भास्कर, रकुल प्रीत सिंग, जरीन खान, यामी गौतम, काजल अग्रवाल, शबाना आझमी, हंसिका मोटवानी, प्रिया मलिक, सोना महापात्रा अशी नावे समोर आली आहेत.

दोन वर्षांपूर्वी म्हणजे 2019 मध्ये, हैदराबादमधील बलात्काराच्या एका घटनेने संपूर्ण देश हादरला होता. या घटनेत एका मुलीवर चार नराधमांनी बलात्कार केला व त्यानंतर मुलीला जिवंत जाळले. याबाबत लोकांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली. पीडितेला न्याय मिळावा यासाठी सोशल मीडियावर अनेक संदेश पोस्ट करण्यात आले होते. अनेक बॉलिवूड आणि दक्षिण भारतीय चित्रपटांतील कलाकारांनी देखील आरोपींविरुद्धचा रोष व्यक्त केला होता आणि पीडितेला न्याय मिळण्याची मागणी केली होती. मात्र यातील काही सेलेब्जकडून पिडीतेचे नाव उघड करण्याची चूक झाली. याबद्दल त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. (हेही वाचा: अभिनेत्री Jasleen Matharu रुग्णालयात दाखल; Sidharth Shukla च्या अकाली जाण्यामुळे बसला मोठा धक्का (Watch Video)

भारतीय न्यायव्यवस्थेनुसार कोणत्याही बलात्कार पीडितेचे नाव, फोटो किंवा ओळख सार्वजनिक करणे दंडनीय गुन्हा आहे. गौरव गुलाटी म्हणतात, इतरांसाठी आदर्श बनण्याऐवजी या कलाकारांनी नियमांचे उल्लंघन करून समाजात चुकीचे उदाहरण ठेवले आहे. त्यामुळे या प्रकरणात या सर्व कलाकारांना तत्काळ अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.