Farmers Protest: दिलजीत दोसांझची आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 1 कोटीची मदत; खरेदी केले जातील गरम कपडे आणि ब्लँकेट
दिल्लीतील विज्ञान भवन येथे सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये चर्चेची पाचवी फेरी आज पार पडली मात्र त्यातून काही निष्पन्न झाले नाही. दरम्यान, पंजाबी चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटीही आता शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत.
कृषी कायद्यांविरूद्ध शेतकर्यांचे आंदोलन (Farmers Protest) अजूनही सुरूच आहे. दिल्लीतील विज्ञान भवन येथे सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये चर्चेची पाचवी फेरी आज पार पडली मात्र त्यातून काही निष्पन्न झाले नाही. दरम्यान, पंजाबी चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटीही आता शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजितसिंह दोसांझ (Diljit Dosanjh) शनिवारी सिंघू बॉर्डरवर आंदोलन करणाऱ्या शेतकर्यांना भेटण्यासाठी पोहोचला होता. आता बातमी मिळत आहे की, सिंघू सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये वृद्ध आहेत आणि सध्या थंडीचे वातावरण आहे, हे ध्यानात घेऊन दिलजितने हिवाळ्यापासून बचाव करण्यासाठी एक कोटी रुपयांची देणगी दिली आहे.
या पैशांमधून शेतकरी गरम कपडे खरेदी करु शकतील. पंजाबी गायक सिंघाने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून ही बाब उघडकीस आणली. त्याने या उदात्त कारणासाठी दिलजितचे आभार मानले आहेत. पंजाबी गायक सिंघाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो दिलजीतचे आभार मानत आहे. तसेच त्याने अभिनेत्याच्या उदात्त कार्याबद्दल त्याचे कौतुकही केले आहे.
सिंघाने व्हिडिओ शेअर करताना म्हटले आहे की, 'दिलजित दोसांझने मोठे दान केले आहे. त्याने ही देणगी देऊन याचा गाजावाजा करण्याचा प्रयत्न केला नाही. या पैशाचा उपयोग वयोवृद्ध शेतकऱ्यांसाठी गरम कपडे आणि ब्लँकेट खरेदी करण्यासाठी केला जाईल. सध्या कृषी बिलाचा विरोध करण्यासाठी शेतकरी कडाक्याच्या थंडीमध्ये आंदोलन करीत आहेत. अशा शेतकऱ्यांना दलजितच्या मदतीमुळे मोठा आधार मिळाला आहे.' सोबतच सिंघाने दलजितचे आभारही मानले आहेत. (हेही वाचा: शेतकऱ्यांच्या मागण्या केंद्राने पूर्ण कराव्यात, अभिनेता दिलजीत दोसांज याची सरकारला विनंती)
शेतकऱ्यांची भेट घेतल्यानंतर दिलजित दोसांझने त्यांना संबोधित केले. तो म्हणाला, 'आमची केंद्राकडे एकच विनंती आहे की, कृपया शेतकर्यांच्या मागण्या पूर्ण करा. सर्व लोक येथे शांततेत बसले आहेत आणि संपूर्ण देश शेतकर्यांच्या पाठीशी आहे. तुम्हा सर्वांना सलाम, शेतकऱ्यांनी एक नवा इतिहास रचला आहे. हा इतिहास येणाऱ्या पिढ्यांना सांगितला जाईल. शेतकर्यांच्या प्रश्नांना कधीही टाळू नये.'
दरम्यान, कृषी विधेयक 2020 ला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांनी आता 8 डिसेंबर रोजी भारत बंदची घोषणा केली आहे. ते म्हणाले आहेत की, जोपर्यंत सरकार शेतकर्यांच्या मागण्या पूर्ण करीत नाही आणि हे बिल मागे घेत नाही, तोपर्यंत ते मागे हटणार नाहीत.