Fake COVID-19 Vaccine Scam: बनावट लस घोटाळयामध्ये Tips Industries ची फसवणूक; 365 कर्मचार्यांना अद्याप प्रमाणपत्र मिळाले नाही- Ramesh Taurani
टिप्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे (Tips Industries Ltd) प्रमुख, बॉलिवूड चित्रपट निर्माता रमेश तौरानी (Ramesh Taurani) यांनी आपल्या कंपनीमध्ये लसीकरणाबाबत मोठा घोटाळा झाला असल्याचे सांगितले आहे
कोरोना विषाणूवर (Coronavirus) मात करण्यासाठी देशात लसीकरण (Vaccination) मोहीम मोठ्या प्रमाणात राबवली जात आहे. मात्र आता यामध्ये लोकांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी कानावर येत आहेत. कांदिवलीमध्ये बोगस लसीकरण प्रकरण उघडकीस आले होते, त्यानंतर आता मुंबईमधील बोगस लसीकरण रॅकेटचा फटका बॉलिवूडच्या प्रॉडक्शन हाऊसलाही बसल्याचे समोर आले आहे. टिप्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे (Tips Industries Ltd) प्रमुख, बॉलिवूड चित्रपट निर्माता रमेश तौरानी (Ramesh Taurani) यांनी आपल्या कंपनीमध्ये लसीकरणाबाबत मोठा घोटाळा झाला असल्याचे सांगितले आहे. इंडिया टुडे टेलिव्हिजनला याबाबत माहिती देताना ते म्हणाले की, त्यांच्या 365 कर्मचार्यांचे 30 मे आणि 3 जून रोजी लसीकरण करण्यात आले होते, परंतु अद्याप त्यांना प्रमाणपत्र मिळालेले नाही.
त्यांनी सांगितले की, आमच्या 356 स्टाफचे लसीकरण केले आणि त्यासाठी आम्ही 1,200 रुपये प्रति डोस जीएसटीसह दिले. परंतु अजूनही प्रमाणपत्र न मिळाल्याने, पैशापेक्षा आम्हाला चिंता आहे की नक्की आम्हाला काय दिले गेले असेल? खरेच ती अस्सल कोव्हिशिल्ड लस होती की एखादी सलाईन, असा प्रश्न आम्हाला पडला आहे. तौराणी म्हणाले, 'आम्ही अजूनही प्रमाणपत्रांच्या प्रतीक्षेत आहोत. जेव्हा माझ्या कार्यालयातील लोकांनी एसपी इव्हेंट्स मधील संजय गुप्ता यांच्याशी संपर्क साधला, तेव्हा ते म्हणाले की शनिवार-12 जूनपर्यंत कोकिलाबेन धीरूबाई अंबानी रुग्णालयात आम्हाला लसीकरणाचे प्रमाणपत्र मिळेल, मात्र अजूनही ते मिळाले नाही.’
मुंबईतील कांदिवलीमधील एका सोसायटीमध्ये बोगस लसीकरण रॅकेट उघडकीस आल्यानंतर, आता मुंबईतील अनेक प्रॉडक्शन हाऊसेसनाही अशाच परिस्थितीचा सामना करावा लागला असल्याचे दिसून आले आहे. उदाहरणार्थ, मॅचबॉक्स पिक्चर्सच्या सुमारे 150 कर्मचारी आणि कुटुंबातील सदस्यांना, 29 मे रोजी कोव्हिशील्डचा पहिला शॉट देण्यात आला. योगायोगाने कांदिवलीच्या हिरानंदानी इस्टेट सोसायटीमध्येही त्याच ग्रुपने लसीकरण केले होते. मॅचबॉक्स पिक्चर्समधील कर्मचार्यांना सांगण्यात आले होते की, त्यांना कोकिलाबेन धीरूबाई अंबानी रुग्णालयातून प्रमाणपत्रे मिळतील. मात्र त्यांना आठवड्याभराने नानावटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलकडून प्रमाणपत्र मिळाले, ज्यामध्ये 12 जूनला शॉट देण्यात आल्याची तारीख दाखवली होती.
दरम्यान, अशा बोगस लसीकरणामुळे केवळ टिप्स इंडस्ट्रीजचीच फसगत झाली नाही, तर एसपी इव्हेंट्सद्वारे अनेक प्रॉडक्शन हाऊसमध्ये घोटाळा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)