Drug Case: ड्रग्ज प्रकरणात अभिनेता अर्जुन रामपालचा क्लीन चीट नाही; विधानात आढळली विसंगती, पुन्हा होऊ शकते चौकशी- NCB
नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो, मुंबईचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी ही माहिती दिली
चित्रपट अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या निधनानंतर सुरु झालेल्या बॉलीवूड ड्रग्ज प्रकरणाच्या (Drug Case) चौकशीमध्ये नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) सोमवारी बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालची (Actor Arjun Rampal) सुमारे सहा तास चौकशी केली. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. अर्जुन रामपालची चौकशी होण्याची एका महिन्यात ही दुसरी वेळ आहे. आज अभिनेता अर्जुन रामपाल याच्या चौकशीदरम्यान त्याच्या विधानात विसंगती आढळली, त्यामुळे पुन्हा एकदा त्याला चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते. नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो, मुंबईचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी ही माहिती दिली.
मॉडेल-अभिनेता अर्जुन रामपाल सकाळी साडेअकरा वाजता दक्षिण मुंबईतील एनसीबी कार्यालयात पोहोचला होता आणि सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास तो तिथून निघताना दिसला. चौकशीदरम्यान अर्जुन रामपालने एनसीबीला दिलेल्या प्रिस्क्रिप्शनच्या तारखेमध्ये छेडछाड केल्याचा संशय आहे. एनसीबीने डॉक्टरांचे निवेदनही नोंदवले आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार अभिनेत्याला मागील आठवड्यात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते, परंतु त्याने वैयक्तिक कारणांमुळे केंद्रीय एजन्सीसमोर हजर राहण्यासाठी 22 डिसेंबरपर्यंत मुदत मागितली होती.
एनसीबीने गेल्या महिन्यात अर्जुन रामपाल आणि त्याची गर्लफ्रेंड गॅब्रिएला देमेट्रिआडिस यांची चौकशी केली होती. त्यानंतर गॅब्रिएलाचा भाऊ अॅगिसिलोस याला अटक केली. एनसीबीने सांगितले की, ज्या रिसॉर्टमध्ये अॅगिसिलोस डेमेट्रॅडिस आपल्या मैत्रिणीसोबत राहत होता तिथे छापा टाकला असता त्यांच्याजवळ 0.8 ग्रॅम चरस जप्त करण्यात आले. अॅगिसिलो याच्याविरूद्ध नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रोपिक सबस्टन्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि नंतर त्याला विशेष एनडीपीएस कोर्टाने जामीन मंजूर केला. (हेही वाचा: देश सोडून जाण्याचा बातम्यांवर भडकला अर्जुन रामपाल, न्यूज चॅनलला दिली ट्रॅव्हल एजेंटची उपमा)
नोव्हेंबरमध्ये एंटी ड्रग्स एजन्सीने रामपालच्या वांद्रे येथील निवासस्थानावर छापा टाकून लॅपटॉप, मोबाईल फोन आणि पेन ड्राईव्हसह 11 उपकरणे व औषधे जप्त केली. काही कागदपत्रे आणि बंदी घातलेल्या गोळ्या जप्त झाल्याने रामपालला समन्स पाठविण्यात आले होते.