Disha Salian Death Case: मुंबई पोलिसांचा निष्काळजीपणा; सुशांतसिंह राजपूतची एक्स मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचे फोल्डर 'चुकून' केले डिलीट
बिहार पोलिसांची एक टीम सध्या मुंबईनमध्ये असून या प्रकाराचा चहुबाजूंनी तपास होत आहे.
बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आत्महत्या प्रकरणात आता बिहार पोलिसांनी लक्ष घालायला सुरुवात केली आहे. बिहार पोलिसांची एक टीम सध्या मुंबईनमध्ये असून या प्रकाराचा चहुबाजूंनी तपास होत आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांच्या कामाचा सावळा गोंधळ किंवा त्यांचे 'दुर्लक्ष' उघडकीस आले आहे. अशी माहिती मिळाली आहे की, मुंबई पोलिसांनी 'चुकून' सुशांतची एक्स मॅनेजर दिशा सालियनच्या (Disha Salian) आत्महत्येच्या प्रकरणाशी संबंधित फोल्डर डिलीट केले आहे. इतकेच नाही तर, बिहार पोलिसांना संगणक/लॅपटॉप देण्यासही नकार देण्यात आला आहे. बिहार पोलिसांचे म्हणणे आहे की, लॅपटॉप मिळाला तर ते फोल्डर पुन्हा प्राप्त होऊ शकेल.
रिपब्लिक वर्डने दिलेल्या वृत्तानुसार, दिशा सालियनच्या आत्महत्येबद्दल काही महत्वाची माहिती मिळविण्यासाठी बिहार पोलिसांची टीम शनिवारी सायंकाळी मालवणी पोलिस ठाण्यात पोहोचली. सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांचे तपास अधिकारी ही सर्व माहिती तोंडी सांगत होते. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या तपास अधिकाऱ्याला एक फोन आला आणि त्यानंतर गोष्टी बदलल्या. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यानंतर मुंबई पोलिसांच्या वतीने सांगितले गेले की, अनवधानाने दिशाशी संबंधित फाइल फोल्डर डिलीट झाले. यानंतर संगणक/लॅपटॉपदेखील बिहार पोलिसांना देण्यात आला नाही.
बिहार पोलिस मुख्यत्वे सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूचा तपास करीत आहेत. या प्रकरणी शनिवारी त्यांनी दिशाशी संबंधित प्रकरण पुन्हा उघडण्याची मागणी केली होती, जेणेकरून दोन्ही मृत्यूमधील संभाव्य संबंध समजून घेता येतील. दरम्यान, रविवारी बिहार पोलीस दिशाच्या कुटुंबातील सदस्यांचे निवेदन नोंदण्याची शक्यता आहे. तसेच सुशांतच्या आत्महत्येच्या दिवशी ज्या व्यक्तीने दरवाजाची चावी बनवली त्याचा शोध घेतला जात आहे. (हेही वाचा: सुशांत सिंह राजपूतच्या पैशांवर रियाने केली चैन? सुशांतचे कोट्यावधी रुपये रियाच्या वैयक्तिक गोष्टींसाठी खर्च, बँक स्टेटमेन्टमधून धक्कादायक माहिती उघड)
दरम्यान, अशा अनेक गोष्टींमुळे मुंबई पोलिसांवर टीका होऊ लागली आहे. सुशांतच्या आत्महत्येचे प्रकरण सीबीआयकडे सोपवा, मुंबई पोलिसांनी फक्त पब्लिसिटी म्हणुन बड्या लोकांची चौकशी केली, असे मत केंद्रीय मंत्री आर.के. सिंह यांनी व्यक्त केले आहे.