Dharma Productions: मुकेश अंबानी आणि करण जोहर यांच्यात भागीदारीची शक्यता; Reliance Industries खरेदी करू शकते धर्मा प्रोडक्शनमध्ये हिस्सा
दोस्ताना, अग्निपथ, कुछ कुछ होता, कभी खुशी कभी गम, कल हो ना हो, कभी अलविदा ना कहना, माय नेम इज खान, ये जवानी है दिवानी, टू स्टेट्स, बद्रीनाथ की दुल्हनिया, राझी असे अनेक हिट चित्रपट धर्मा प्रॉडक्शनखाली तयार झाले आहेत.
देशातील श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (Reliance Industries Limited) लवकरच दिग्गज बॉलीवूड चित्रपट निर्माता करण जोहरच्या (Karan Johar) धर्मा प्रॉडक्शनमध्ये (Dharma Productions) हिस्सा खरेदी करू शकते. जर हा करार झाला, तर ही पहिलीच वेळ असेल जेव्हा रिलायन्स इंडस्ट्रीजसुद्धा कंटेंट निर्मिती क्षेत्रात प्रवेश करेल. करण जोहरला त्याची निर्मिती कंपनी धर्मा प्रॉडक्शनमधील आपली हिस्सेदारी विकायची आहे, परंतु ज्या कंपन्यांशी तो यापूर्वी मूल्यांकनावर चर्चा करत होता त्यांच्याशी चर्चा करून कोणतेही ठोस परिणाम मिळालेले नाहीत.
इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार सारेगामा इंडिया लिमिटेड धर्मा प्रॉडक्शनमधील बहुसंख्य स्टेक विकत घेण्याची योजना आखत होती, ज्याची बातमी गेल्या आठवड्यात समोर आली होती. पण आता रिलायन्स इंडस्ट्रीज धर्मा प्रॉडक्शनमधील हिस्सेदारी विकत घेण्याची चर्चा सुरू आहे. मात्र, या कराराशी संबंधित इतर गोष्टी अद्याप उघड झालेल्या नाहीत. धर्मा प्रॉडक्शनमध्ये करण जोहरची 90.7 टक्के हिस्सेदारी आहे, तर 9.24 टक्के भागीदारी त्याची आई हिरू जोहरकडे आहे.
धर्मा प्रोडक्शनने बॉलिवूडमध्ये अनेक मोठे आणि यशस्वी चित्रपटांची निर्मिती केली आहे. दोस्ताना, अग्निपथ, कुछ कुछ होता, कभी खुशी कभी गम, कल हो ना हो, कभी अलविदा ना कहना, माय नेम इज खान, ये जवानी है दिवानी, टू स्टेट्स, बद्रीनाथ की दुल्हनिया, राझी असे अनेक हिट चित्रपट धर्मा प्रॉडक्शनखाली तयार झाले आहेत. मात्र गेल्या काही वर्षांत ही संस्था आर्थिक विवंचनेचा सामना करत आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या कंटेंट पोर्टफोलिओमध्ये जिओ स्टुडिओ, वायकॉम18 स्टुडिओ व्यतिरिक्त, बालाजी टेलीफिल्म्सचाही समावेश आहे. या सर्व कंपन्यांमध्ये रिलायन्सची हिस्सेदारी आहे. जिओ स्टुडिओ हा सध्या देशातील सर्वात मोठा फिल्म स्टुडिओ आहे ज्याने 2023-24 मध्ये बॉक्स ऑफिसवर 700 कोटी रुपयांची कमाई केली होती. कंपनीने मॅडॉक फिल्म्ससोबत स्त्री 2 चित्रपटाची निर्मिती केली आहे, ज्याने बंपर कमाई केली आहे. (हेही वाचा: Do Patti Trailer Out: काजोल, क्रिती सेनन आणि शाहीर शेख स्टारर दो पत्ती चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, पहा व्हिडिओ)
दरम्यान, याआधी, सारेगामाच्या मूळ समूह आरपी संजीव गोयंका समूहासोबत धर्मा प्रॉडक्शनची हिस्सेदारी विकण्यासाठी चर्चा सुरू असल्याचे वृत्त समोर आले होते. परंतु 8 ऑक्टोबर 2024 रोजी बीएसईकडे केलेल्या नियामक फाइलिंगमध्ये सारेगामाने म्हटले आहे की, कंपनी व्यवसायाच्या वाढीसाठी आणि विस्तारासाठी नेहमी वेगवेगळ्या धोरणात्मक संधींचा आढावा घेत असते. दुसरीकडे, धर्मा प्रॉडक्शनचा महसूल 2022-23 या आर्थिक वर्षात चार पटीने वाढून 1040 कोटी रुपये झाला, जो मागील आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 276 कोटी रुपये होता. तथापि, नफा 59 टक्क्यांनी घसरला आणि 11 कोटी रुपये झाला.