Cyber Fraud: अभिनेता Aftab Shivdasani ची केवायसीच्या बहाण्याने आर्थिक लूट; दीड लाखांचा गंडा

सध्या या प्रकरणामध्ये पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Cyber Security | Image Used for Representational Purpose (Photo Credits: Pexels)

आजकाल ऑनलाईन फ्रॉड (Online Fraud) होण्याच्या प्रकारांमध्ये आणि संख्येमध्येही वाढ होत आहे. अगदी सहजपणे आपल्या नकळत आपली खाजगी माहिती चोरली जाऊ शकतो आणि या मधून मोठा आर्थिक गंडा पडतो. अनेक सामान्य नागरिक त्याला बळी पडले आहेत. नुकताच असाच प्रकार बॉलिवूड अभिनेता आफताब शिवदासानी (Aftab Shivdasani ) सोबतही घडला आहे. आफताब सोबत झालेल्या सायबर फ्रॉड (Cyber Fraud) मधून त्याने दीड लाख गमावल्याचा प्रकार समोर आला आहे.

आफताबला एक टेक्स्ट मेसेज आला होता. त्यामध्ये त्याचे केवायसी अपडेट करायचे आहे असं सांगण्यात आलं होतं. केवायसी अपडेट करण्यासाठी आफताबने देखील मेसेज मध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक केले होते. पण इथेच फसवणूक सुरू झाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताबने लिंकवर क्लिक केल्यानंतर त्याला एका आघाडीच्या खाजगी बॅंकेच्या पेजवर नेण्यात आले. काही क्षणात त्याचे दीड लाख रूपये अकाऊंट मधून गेले. दरम्यान मेसेज मध्ये जर केवायसी पूर्ण केली नाही तर अकाऊंट बंद होईल असा इशारा देण्यात आला होता.

आफताबला आर्थिक फसवणूक झाल्याचा अंदाज आल्यानंतर त्याने या प्रकरणाची माहिती आधी ब्रांच मॅनेजरला दिली पण ही फसवणूक असल्याने आफताबला त्यांनी पोलिसांत तक्रार देण्यास सांगितले. वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये त्याने या प्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे. रविवार 8 ऑक्टोबरची ही घटना आहे. आफताबने सोमवारी 9 ऑक्टोबरला पोलिसांत आपली तक्रार दाखल केली. नक्की वाचा: Cyber Fraud in Pune: अमेझॉनच्या नावे ऑनलाईन टास्क करण्याच्या नादात प्रोफेसरने गमावले 21 लाख; तपास सुरू .

कलम 420 (फसवणूक) आणि आयटी अ‍ॅक्ट अंतर्गत पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली आहे. सध्या या प्रकरणामध्ये पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.