भाजप खासदार व अभिनेत्री Hema Malini यांचा अजब दावा; Covid-19 ला दूर ठेवण्यासाठी घरी रोज करा हवन (Watch Video)

त्या दरम्यान, मुंबई येथील हेमा मालिनी यांच्या निवासस्थानी पर्यावरण दिनी हवन आयोजित करण्यात आला होता.

हेमा मालिनी यांनी केला हवन (संग्रहित संपादित प्रतिमा)

देशात कोरोना विषाणूचा (Coronavirus) कहर कायम आहे. सध्या जरी कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या कमी होत असली तरी, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या अजूनही कमी झालेली नाही. दुसरीकडे, काळ्या बुरशीच्या नवीन आजाराने लोकांच्या चिंता वाढवल्या आहेत. अशात कोरोना नियंत्रणासाठी लसीकरणावर जोर देण्यात येत आहे. मात्र अजूनही अनेक खासदार, आमदार, मंत्री कोरोनाला दूर ठेवण्यासाठी चित्र-विचित्र उपाय सांगत आहेत. आता यामध्ये मथुराच्या भाजप खासदार व अभिनेत्री हेमा मालिनी (Mathura Member of Parliament Hema Malini) यांची भर पडली आहे. खासदार हेमा मालिनी यांनी दावा केला आहे की, हवन (Havan) हा कोरोना रोखण्यासाठी योग्य उपाय आहे.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्या दरम्यान, मुंबई येथील हेमा मालिनी यांच्या निवासस्थानी पर्यावरण दिनी हवन आयोजित करण्यात आला होता. यावेळी हेमा मालिनी म्हणाल्या की कोरोनापासून बचाव करण्यासाठी हवन करणे योग्य ठरेल.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये हेमा मालिनी म्हणत आहेत की, ‘प्राचीन काळापासून भारतात हवन करण्याची प्रथा फायदेशीर आणि नकारात्मक शक्तींना शुद्ध करण्याचा योग्य मार्ग मानला गेला आहे. आज संपूर्ण जग साथीचा आजार आणि पर्यावरणीय संकटाला सामोरे जात आहे, अशा परिस्थितीत केवळ पर्यावरण दिनाच्या दिवशीच नाही तर ही साथ संपेपर्यंत सर्वांनी घरी हवन केले पाहिजे. हवनशी कोणताही धर्म जोडला गेला नाही. हा मानवतेला वाचवण्याचा उपाय आहे.’

हेमा मालिनी दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये म्हणत आहेत की, ‘भारतात कोरोना संसर्गाला सुरुवात झाल्यापासून मी धूप जाळून हवन करीत आहे. मी सकाळी आणि संध्याकाळी दोन्हीवेळी हवन करते. घरात हवन केल्याने गृहकलश होत नाही. तसेच कोरोना किंवा इतर आजार दूर ठेवण्यासाठीही हवन गरजेचे आहे. धूपासोबत गाईची शुद्ध तूप, कडुलिंबाची पाने आणि लोबान अशा गोष्टी हवनमध्ये घालते. धूप-हवनद्वारे घरातील वातावरण शुद्ध होते. मी रोज हवन करते, तुम्हीही करा.’ (हेही वाचा: बाबो! Covid-19 चा नाश करण्यासाठी भाजप आमदार Abhay Patil यांनी केले होम-हवन; शहरभर काढली मिरवणूक (Watch Video)

दरम्यान, याआधी कर्नाटकचे भाजपा आमदार अभय पाटील (Abhay Patil) यांनी कोरोनापासून वाचण्यासाठी होम-हवन केले होते. त्यानंतर त्यांनी मिरवणूकही काढली होती. या धुरामुळे कोरोना पळून जाईल असे त्यांना वाटत होते.