शौर्यचक्रविजेते मराठा युद्धवीर मधुसूदन सुर्वे यांचा जीवनपट रुपेरी पडद्यावर; निर्माते-दिग्दर्शक नीरज पाठक यांची घोषणा

सुर्वे यांना 2005 मध्ये मणिपूरमध्ये नक्षलवाद्यांविरुद्धच्या लढ्यात असामान्य शौर्य दाखवल्याबद्दल शौर्य चक्राने सन्मानित करण्यात आले आहे. या घटनेनंतर सहा वर्ष आणखी सेवा केल्यानंतर ते 2011 मध्ये निवृत्त झाले.

मधुसूदन सुर्वे (संग्रहित संपादित प्रतिमा)

‘माझी खुकरी कुठे आहे?’ कमांडो मधुसूदन सुर्वे यांनी अत्यंत शांतपणे विचारले, जाणीव आणि बेशुद्धीच्या सीमेवर असलेल्या सुर्वे यांना होत असलेल्या असह्य वेदनांमध्ये मॉर्फिन वेदना सहन करण्यास मदत करीत होते. याच स्थितीत त्यांनी खुकरी घेऊन स्वतःचा डावा पाय गुडघ्यापर्यंत कापला आणि ‘आता मलमपट्टी करा,’ असे उपचार करणाऱ्या डॉक्टरांना सांगितले. तसेच  ‘पायात ताकद उद्याच येईल,’ असेही म्हटले. डॉक्टरांना सांगितल्याप्रमाणे सुर्वे दोन पायांनी घरी निघाले,  मात्र फरक फक्त एवढाच होता की, एक पायात जयपूर फूट होता, दुसऱ्या पायात लोखंडी रॉड आणि पोटात कृत्रिम आतडे होते. शत्रूने त्यांच्या शरीराला इजा केली होती, पण त्यांचा आत्मा मात्र नेहमीसारखाच होता.

लेखक-निर्माता-दिग्दर्शक नीरज पाठक अशा या युद्धवीराचे जीवन पडद्यावर आणण्यास सज्ज झाले आहेत. नीरज पाठक दिग्दर्शित या चित्रपटाची घोषणा सुर्वे यांच्या देशभक्तीने भारलेल्या शिवतर गावी करण्यात आली. यावेळी मराठा युद्धाचा नायक सुर्वे यांनी नीरज यांचा शाल देऊन सन्मान केला. ‘मधुसूदन सुर्वे यांच्यासारख्या शूरवीरांचे घर असेपर्यंत भारत नेहमीच स्वतंत्र राहील,’ असे भावनिक उद्गार नीरज पाठक यांनी यावेळी काढले.

मधुसूदन सुर्वे हे एक माजी पॅराकमांडो असून शत्रूच्या आक्रमणाचा सामना करण्यासाठी ते सीमेवर तैनात होते.  शत्रूच्या मागावर राहून सर्जिकल स्ट्राइकद्वारे शत्रूचा विध्वंस आणि शत्रूच्या महत्वाच्या पायाभूत सुविधा आणि दळणवळणाचा नाश करण्याचे प्रशिक्षण त्यांना देण्यात आले होते. सुर्वे हे कट्टर देशभक्त फक्त मशीन गन चालवणे किंवा रॉकेट लाँचर चालवण्यासाठी नव्हते तर सुर्वे यांच्या रक्तात लहानपणापासूनच देशभक्तीचे वारे भिनले होते. देशभक्त असल्याने अर्धा पगार घेऊन सुर्वे सैन्यात भरती झाले होते.

रत्नागिरीतील खेड तालुक्यातील शिवतर गाव हे सैनिकांचे गाव म्हणून ओळखले जाते. या गावातील प्रत्येक घरातील व्यक्ती भारतीय सैन्यात भरती होण्याची परंपरा आजही कायम आहे. शिवतरमधील जवळजवळ प्रत्येक कुटुंबात सैन्यात जाऊन देशाची सेवा करणारे पुरुष आहेत. युद्धनायक मधुसूदन सुर्वे यांच्या वंशजांनीही लष्करी गणवेश परिधान केला होता. पहिल्या महायुद्धात मृत्युमुखी पडलेल्या भारतीय सैनिकांमध्ये 18 शूर सैनिक या गावातील सुपुत्र होते.

आसाममधील ऑपरेशन गेंडा, जम्मू-काश्मीरमधील ऑपरेशन रक्षक, कारगिलमधील ऑपरेशन विजय, नागालँडमधील ऑपरेशन ऑर्किड आणि मणिपूरमधील ऑपरेशन हिफाजतमध्ये त्यांनी कर्तव्य बजावले आहे, जिथे त्यांनी आणि त्यांच्या टीमने 32  हून अधिक अतिरेक्यांना यमसदनी पाठवले. मणिपुरच्या चकमकीत सुर्वे जखमी झाले होते आणि त्यांनी पायही गमावले होते. सुर्वे दक्षिण आफ्रिकेतील काँगो येथे संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेवरही होते. त्यांच्या कुटुंबाची पुढची पिढीही देशसेवेसाठी कार्यरत आहे. त्यांचा मुलगा एनडीएची तयारी करत असून मुलगी वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहे.

सुर्वे यांना 2005 मध्ये मणिपूरमध्ये नक्षलवाद्यांविरुद्धच्या लढ्यात असामान्य शौर्य दाखवल्याबद्दल शौर्य चक्राने सन्मानित करण्यात आले आहे. या घटनेनंतर सहा वर्ष आणखी सेवा केल्यानंतर ते 2011  मध्ये निवृत्त झाले. देशभक्त सुर्वे त्यांच्या कामगिरीबद्दल समाधानी आहेत. यावेळी नीरज पाठक म्हणाले, ‘युद्धात फक्त विजेते असतात, उपविजेते नसतात. सैनिक एकतर तिरंगा फडकावतो किंवा त्यात गुंडाळून परत येतो. मधुसूदन सुर्वे यांचे शौर्य थक्क करणारे आहे, त्यामुळेच मी त्यांच्या बायोपिकचे हक्क घेतले. हा चित्रपट, बायोपिक नसून एक काल्पनिक कथा असावी असे त्यांचे शौर्य पाहिल्यानंतर प्रेक्षकांना वाटेल.’

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now