The Accidental Prime Minister सिनेमावरुन अनुपम खेर यांच्यासह 13 जणांविरोधात FIR दाखल करण्याचे आदेश
सिनेमात प्रमुख भूमिकेत असलेले अभिनेते अनुपम खेर कायद्याच्या कचाट्यात अडकल्यानंतर आता सिनेमासंबंधित 13 जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.
'द एक्सीडेंटल प्राईम मिनिस्टर' (The Accidental Prime Minister) या सिनेमावरुन सध्या चांगलाच वाद रंगला आहे. सिनेमात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांच्या भूमिकेत असलेले अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) कायद्याच्या कचाट्यात अडकल्यानंतर आता सिनेमासंबंधित 13 जणांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बिहारच्या मुज्जफरफुर येथील न्यायालयातील न्यायाधीशांनी एफआरआर (FIR) दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
या सिनेमाला विरोध करत सुधीर ओझा या वकीलांनी कोर्टात याचिका सादर केली होती. त्यानंतर आता कोर्टात याचिकेवर सुनावणी सुरु असताना अनुपम खेर यांच्यासह इतर 13 जणांवर एफआयआर दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची प्रतिमा या सिनेमाद्वारे मलीन करण्याचा प्रयत्न होत असल्याचे सुधीर यांनी याचिकेत म्हटले आहे. सिनेमाचा ट्रेलरही युट्युबवरुन हटवण्यात आला असून अनुपम खेर यांनी त्याबद्दल युट्युबकडे मदतही मागितली आहे.