Amitabh Bachchan Tests Negative For Coronavirus: अमिताभ बच्चन यांची कोरोना विषाणू चाचणी आली निगेटिव्ह; आता घरीच करणार आराम, जाणून घ्या आजच्या दिवसाचे 'कुली अपघाताशी' असलेले कनेक्शन
बॉलीवूडमधील तसेच छोट्या पडद्यावरील काही कलाकारांना कोरोनाची लागण झाल्याच्या अनेक बातम्या कानावर आल्या आहेत. अशात 11 जुलै रोजी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) व अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) या दोघांनाही कोरोना विषाणूची लागण झाल्याची माहिती मिळाली होती.
सध्या अगदी सर्वसामान्य नागरिकांपासून ते राजकारणी, सेलेब्ज, खेळपटू अशा अनेकांना कोरोना विषाणूने (Coronavirus) ग्रासले आहे. बॉलीवूडमधील तसेच छोट्या पडद्यावरील काही कलाकारांना कोरोनाची लागण झाल्याच्या अनेक बातम्या कानावर आल्या आहेत. अशात 11 जुलै रोजी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) व अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) या दोघांनाही कोरोना विषाणूची लागण झाल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर संपूर्ण देशभरात बच्चन कुटुंबियांसाठी प्रार्थना होत होत्या. आता या प्रार्थनेचे फळ मिळत आहे, अमिताभ बच्चन यांनी कोरोनावर मात देऊन ते या आजारातून बरे झाले आहेत.
अभिषेक बच्चन याने ट्वीट करत ही माहिती दिली. आपल्या ट्वीटमध्ये तो म्हणतो, 'माझे वडील (अमिताभ बच्चन) यांची कोरोना विषाणूची चाचणी नकारात्मक आली आहे. आता त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. ते आता घरीच आराम करतील. तुमच्या सर्व प्रार्थनेबद्दल आणि तुम्ही शुभेच्छा दिल्याबद्दल सर्वांचे आभार.'
अभिषेकने पुढे स्वतःबद्दलही सांगितले आहे. तो म्हणतो, ‘दुर्दैवाने माझ्यामध्ये अजूनही कोरोना विषाणूचे काही अंश आहेत व त्यामुळे मी रूग्णालयातच राहणार आहे. पुन्हा एकदा, माझ्या कुटुंबियांसाठी तुम्ही सतत शुभेच्छा आणि प्रार्थना केल्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार. मी लवकरच या विषाणूचा पराभव करीन आणि लवकरच परत येईन,’
अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी अल्यानंतर काही दिवसांमध्येच, ऐश्वर्या राय-बच्चन (Aishwarya Rai-Bachchan) व आराध्या बच्चन (Aaradhya Bachchan) यांचीही कोरोनाची चाचणी सकारात्मक आली होती. या चौघांनाही नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 27 जुलै रोजी ऐश्वर्या व आराध्या यांना डिसचार्ज मिळाला होता. अमिताभ बच्चन रुग्णालयात असतानाही सोशल मिडियावर खूपच सक्रीय होते. त्यांनी रुग्णालयातून केलेली अनेक ट्वीट व्हायरल झाले होते. (हेही वाचा: ऐश्वर्या राय-बच्चन व आराध्या बच्चन यांची कोरोना विषाणू चाचणी आली निगेटिव्ह; हॉस्पिटलमधून घरी रवानगी)
दरम्यान, तब्बल 38 वर्षांपूर्वीचा अमिताभ बच्चन यांच्यासोबत झालेला ‘कुली’ चित्रपटावेळचा अपघात तुम्हाला माहित असेलच. या अपघातावेळीही अमिताभ बच्चन यांच्या उदंड आयुष्यासाठी देशातूनच नाही तर जगभरातून प्रार्थना केल्या जात होत्या. या अपघातातून बरे होणे ही गोष्ट अमिताभ बच्चन यांच्यासाठी जणू काही दुसरा जन्म घेण्यासारखे होते. 38 वर्षांपूर्वी याच दिवशी म्हणजे, 2 ऑगस्ट रोजी अमिताभ बरे होऊन आपल्या घरी गेले होती. योगायोग म्हणजे आज 2 ऑगस्ट 2020 मध्ये ते कोरोना विषाणूवर मात देऊन घरी परतले आहेत.