75th Cannes Film Festival: यंदाच्या कान्स महोत्सवात अनुराग ठाकूर यांच्या सोबत आर.माधवन, ए.आर.रहमान, अक्षय कुमारसह अनेक सेलेब्ज लावणार उपस्थिती

या अन्तर्गत 5 नवीन स्टार्टअप उद्योगांना दृक् - श्राव्य उद्योगक्षेत्रात काम करण्याची संधी दिली जाणार आहे.

AR Rahman, Akshay Kumar among celebs to walk Cannes 2022 Red Carpet with Anurag Thakur

पंचाहत्तराव्या कान्स महोत्सवात 'रेड कार्पेट इव्हेंट' (75th Cannes Film Festival) म्हणजे भारतीय प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे. यावेळी 17 मे 2022 रोजी कान्स चित्रपट महोत्सव 2022 च्या उद्घाटनाच्या वेळी 'मानाच्या लाल रुजाम्यावर' भारतभरच्या चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांची पावले पडणार आहेत. हे सर्व प्रतिष्ठित कलाकार भारताच्या प्रतिनिधीमंडळाचे सदस्य म्हणून तेथे उपस्थित असणार आहेत. केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या नेतृत्वात हे प्रतिनिधी मंडळ भारतातून कान्स येथे जाणार आहे. या प्रतिष्ठित व्यक्तींच्या सूचीमध्ये भारताच्या संगीत क्षेत्रातील ठिकठिकाणच्या महत्त्वाच्या कलाकारांचा समावेश आहे. सदर प्रतिनिधिमंडळात पुढील प्रसिद्ध कलाकारांचा अंतर्भाव असेल-

  1. अक्षय कुमार (अभिनेता आणि निर्माता, बॉलिवूड)
  2. ए.आर.रहमान (आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संगीतकार)
  3. मामे खान (लोकसंगीताचे संगीतकार, गायक)
  4. नवाजुद्दीन सिद्दीकी (अभिनेता, बॉलिवूड)
  5. नयनतारा (अभिनेत्री, मल्याळम, तामिळ)
  6. पूजा हेगडे (अभिनेत्री, हिंदी, तेलगू)
  7. प्रसून जोशी (अध्यक्ष, केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ)
  8. आर.माधवन (अभिनेता आणि निर्माता)- 'रॉकेटरी'चा कान्स येथे वर्ल्ड प्रीमिअर (जगातील पहिला खेळ)
  9. रिकी केज (संगीतकार)
  10. शेखर कपूर (चित्रपट निर्माते/दिगदर्शक)
  11. तमन्ना भाटिया (अभिनेत्री, हिंदी, तेलगू, तमिळ चित्रपट)
  12. वाणी त्रिपाठी (अभिनेत्री)

विविधतेने नटलेले भारताचे लोकजीवन, संस्कृती, वारसा आणि अनेक घडामोडी हे सर्व भारतीय चित्रपटांच्या माध्यमातून मांडून संपन्न भारतीयत्वाचा गंध जगापर्यंत पोहोचविण्याचा उद्देश यावर्षी ठेवण्यात आला आहे. देशाची विभिन्न बलस्थाने आणि भारतीयत्वाचे विभिन्न आयाम या सर्वांना प्रतिनिधित्व मिळावे या हेतूने देशाच्या कानाकोपऱ्यातून निवडलेल्या कलाकारांचा समावेश प्रतिनिधिमंडळात करण्यात आला आहे.

नुकत्याच संपन्न झालेल्या बावन्नाव्या इफ्फी-म्हणजेच भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अनेक नवे उपक्रम हाती घेण्यात आले होते. उदा-नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम अशा ओटीटी मंचांशी सहयोग, भविष्य घडवू शकणाऱ्या 75 प्रतिभावंतांना हेरून त्यांचा '75 क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो' हा उपक्रम आणि ब्रिक्स (ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका) चित्रपट महोत्सव. त्याच पद्धतीने यावर्षीच्या कान्स महोत्सवासाठीही नवीन आणि उत्साहवर्धक उपक्रम निश्चित करण्यात आले आहेत.

विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, यावर्षीच्या महोत्सवात 'कान्स फिल्म मार्केट / कान्स चित्रपेठेत' अधिकृत सन्माननीय देशाचा मान भारताला देण्यात आला आहे. हा मान एखाद्या देशाला देण्याची ही पहिलीच वेळ असून, भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना हा मान भारताला मिळत आहे. भारत  आणि फ्रान्सच्या मुत्सद्दी संबंधांचेही हे अमृतमहोत्सवी वर्ष आहे.

'कान्स नेक्स्ट'मध्येही सन्माननीय देश असण्याचा मान भारताला मिळाला असल्याचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पूर्वी घोषित केले होते. या अन्तर्गत 5 नवीन स्टार्टअप उद्योगांना दृक् - श्राव्य उद्योगक्षेत्रात काम करण्याची संधी दिली जाणार आहे.